लघुसिंंचन प्रकल्पांना निधीची उपलब्धता
By Admin | Updated: December 25, 2015 00:40 IST2015-12-24T21:50:50+5:302015-12-25T00:40:11+5:30
राजन साळवींचे प्रयत्न : जलसंपदा, जलसंधारण मंत्र्यांचे सचिवांना आदेश

लघुसिंंचन प्रकल्पांना निधीची उपलब्धता
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह््यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर या चार तालुक्यातील निधीअभावी रखडलेल्या महत्वाच्या लघुसिंंचन प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, या आमदार राजन साळवींच्या मागणीला जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश जलसंधारण सचिवांना देण्यात आले आहेत.
जिल्ह््यात पिण्यासाठी तसेच शेतीकरिता वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर ह्या चार तालुक्यांतील प्रस्तावित लघुसिंंचन प्रकल्पांचा समावेश होता. राजापूर तालुक्यातील जांभवली, तुळसवडे, शिवणे, कोंडवाडी, लांजा तालुक्यातील कुडेवाडी, विवली शिरवली, कोलेवाडी, कोचरी, कुरुंग, कोंडगे, आरगाव, संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, वांझोळे, भोवडे (बार्इंगवाडी) भोवडे (तिथवली) तर रत्नागिरी तालुक्यातील खानू या लघुसिंंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु, यातील काही प्रकल्पांना निविदा प्रक्रियेमुळे स्थगिती मिळाली आहे तर काही प्रकल्पांच्या कामांना प्रारंभ झाला होता. परंतु, निधीअभावी सदर कामे प्रलंबित राहिली आहेत. परिणामी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, प्रकल्पस्थळी काम करणारे मजूर, त्यांची कुटुंबे तसेच ठेकेदार अशा सर्वच घटकांची मोठी कुचंबणा झाली आहे. मजूर व त्यांच्या कुटुंबावरही यामुळे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.
या चार तालुक्यांतील लघुसिंचन प्रकल्पांबाबत आमदार राजन साळवी यांनी नागपूर येथील चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर जलसंपदा व जलसंधारण मंत्री नामदार विजय शिवतारे यांनी आमदार साळवींच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाद्वारे ही कामे चालू आहेत. सदरील महामंडळाला मुदतवाढ नसल्याने तसेच पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे ठप्प आहेत. परंतु, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाला मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, या प्रकल्पांबरोबरच ठेकेदारांची देयके तसेच आवश्यक निधीसाठी शासन तरतूद करणार असल्याचे नामदार शिवतारे यांनी सांगितले.
या रखडलेल्या लघुसिंंचन प्रकल्पांची कामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी आमदार राजन साळवी यांनी नामदार विजय शिवतारे यांची पुन्हा भेट घेतली. या प्रकल्पांना शासनाकडून त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा व तातडीने ही कामे सुरू करावी, अशी विनंती केली. शिवतारे यांनी याबाबतचे आदेश राज्याचे जलसंधारण सचिव पी. के. देशमुख यांना जारी केले आहेत. (प्रतिनिधी)
सर्व रखडलेल्या लघुसिंंचन प्रकल्पांचा राज्यस्तरीय योजनांमध्ये समावेश करावा, असे आदेश विजय शिवतारे यांनी राजन साळवींच्या निवेदनावर कार्यवाही करताना दिले असून, राजन साळवी यांनी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, प्रकल्पस्थळी काम करणारे मजूर, त्यांची कुटूंबे तसेच ठेकेदार आदी सर्व घटकांचा विचार करुन दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे या घटकांना आता तरी न्याय मिळेल, अशा आशा यामुळे निर्माण झाल्या आहेत.