‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही मंत्रीपदासाठी निराशाच
By Admin | Updated: July 19, 2016 23:56 IST2016-07-19T22:32:09+5:302016-07-19T23:56:18+5:30
नीलेश राणे : शिवसेनेच्या आमदारांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका, पक्षवाढीसाठी २४पासून जिल्हा दौरा

‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही मंत्रीपदासाठी निराशाच
रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. ‘मातोश्री’बाहेर घुटमळूनही काही जणांची घोर निराशा झाली. पक्षाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांची पात्रता काय हेच त्यांना दाखवून आहे, या शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांची खिल्ली उडवली.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील कॉँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी येत्या २४ जुलैपासून जिल्ह्यात तालुकानिहाय पक्ष संघटनेच्या बैठका, मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कॉँग्रेसचा महामेळावा घेतला जाणार आहे. २४ जुलै रोजी राजापूर येथून मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. जिल्हाध्यक्ष पद लवकरच भरले जाईल, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण डिसेंबर २०१६मध्ये पूर्ण होईल, असे सांगितले होते. आजची स्थिती पाहिली तर चौपदरीकरणाबाबत नियोजनच नसल्याचे स्पष्ट होत आहे. वळणे तशीच ठेवून चौपदरीकरण केल्याने काय साधणार, असा सवालही त्यांनी केला. भरपाईबाबतही स्पष्टपणे काहीच सांगितले जात नाही. बंदरांचा विकास व वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याचे बुडबुडे काहीजण हवेत उडवत आहेत. नवीन कपडे शिवले की, ते दाखवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर रत्नागिरीत येतात. बाकी काहीच काम ते करीत नाहीत. केवळ आश्वासने देतात, अशी टीका त्यांनी केली.
जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वच योजनांमध्ये कोण व किती लाभार्थी आहेत, याची माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन या भ्रष्टाचाराचाही पर्दाफाश करणार असल्याचे राणे म्हणाले. आम्ही राज्यराणी गाडी सुरू केली. त्यानंतर एकही गाडी कोकणला मिळाली नाही. थांबे, स्थानके वाढवणे म्हणजे मोठे काम झाले, असे नाही, असा टोलाही त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लगावला. (प्रतिनिधी)
मेटेंनी मंत्रीपदाची
भीक मागू नये
विनायक मेटे हे मंत्रीपदासाठी हातात वाटी घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर उभे आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यांचा स्वाभिमान गेला कुठे? मराठा समाजाला हे शोभणारे नाही. मेटे यांनी अशा मंत्रीपदाला लाथ मारावी. मंत्रीपदाची भीक मागू नये. त्यांनी मराठ्यांचे नेतृत्व करावे. आम्हीही त्यांच्याबरोबर येऊ, असे राणे म्हणाले.
केसरकरांनी आधी एक हवालदार सांभाळावा...
गृहराज्यमंत्रीपद मिळालेल्या सेनेच्या दीपक केसरकर यांच्यावर नीलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. हाफ चड्डीतील एक हवालदारही सांभाळू न शकणाऱ्या माणसाला गृहराज्यमंत्रीपद दिले गेले आहे. आधी केसरकर यांनी एक हवालदार सांभाळून दाखवावा, एक पोलीस चौकी सांभाळून दाखवावी, असेही ते म्हणाले.
सामंत मातोश्रीबाहेर घुटमळत होते...
मंत्रीपदाच्या आशेने आमदार उदय सामंत हे मातोश्रीच्या बाहेर घुटमळत होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांची घोर निराशाच झाली, असे राणे म्हणाले. टॉप टेन खासदारांमध्ये विनायक राऊत यांचे नाव एका संस्थेने नमूद केल्याचे निदर्शनास आणताच असे करणाऱ्या या संस्थेचीच माहिती घ्यावी लागेल, असेही राणे म्हणाले.
जाधवांबरोबरचे
गैरसमज संपले...
येत्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झालीच पाहिजे, अशी आपली इच्छा असल्याचे राणे यांनी सांगताच भास्कर जाधवांबरोबच्या वैराचे काय, असे विचारता भास्कर जाधव यांच्याशी आपले व्यक्तीगत कोणतेही वैर नाही. संदीप सावंत नावाच्या माणसामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले होते. ते संपले आहेत, असे ते म्हणाले.