बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

By Admin | Updated: August 10, 2015 00:35 IST2015-08-10T00:35:29+5:302015-08-10T00:35:29+5:30

जैतापूर अणुऊर्जा : बागायतींचा मोबदला अन्यथा जमिनी परत द्या

Freedom of the obstructed Bargatee | बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

बाधित बागायतदारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांना तसे निवेदन सादर केले आहे.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या आंबा बागायती कायमस्वरूपी संपादित करण्यात आल्या आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाधिकारी शेतकऱ्यांना संपादित जागेमध्ये जाण्यास मज्जाव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बागायती, जमिनी बळकावून मोबदला न देता त्यांच्याकडून उत्पन्न हिरावून घेण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निश्चित केले आहे.
शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने, पाठपुरावा करूनसुध्दा दखल घेण्यात येत नाही. गतवर्षी १५ आॅगस्ट २०१४ रोजी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी व प्रातांधिकाऱ्यांनी नंदकुमार राऊत यांना ११ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र पाठवून उपोषणास बसू नका, आपल प्रस्ताव महिनाभरात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनसुध्दा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२६ जानेवारी २०१५ला पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले असता त्यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून आंबा बागायत अहवालाची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी व बागायतदारांशी चर्चा करून संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यात येईल, तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच लाख रूपये खर्च आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव एनपीसीआयएल यांच्याकडे मागणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा आजपर्यंत खुलासा झालेला नाही. एनपीसीआयएल किंवा प्रशासन बागायतींचा मोबादला देण्यास तर तयार नसेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत करा अथवा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांनी १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Freedom of the obstructed Bargatee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.