मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:26+5:302021-03-30T04:19:26+5:30
शासकीय कार्यालये गजबजली रत्नागिरी : आर्थिक वर्ष समाप्तीमुळे शनिवार, रविवार सुट्टी असतानाही जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणेची ...

मोफत लसीकरण
शासकीय कार्यालये गजबजली
रत्नागिरी : आर्थिक वर्ष समाप्तीमुळे शनिवार, रविवार सुट्टी असतानाही जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणेची विविध कार्यालये सुरू होती. सुट्टी असतानाही कर्मचारी अधिकारी कामात व्यस्त होती. दोन दिवसांच्या व्यस्ततेनंतर सोमवारी होळीची सुट्टी घेण्यात आली.
सेवानिवृत्ती वेतन जमा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन शुक्रवार, दि. २६ रोजी सायंकाळी जमा झाले आहे. वास्तविक शासनाच्या नियमानुसार महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत पेन्शन जमा करण्याचे निर्देश असताना महिनाअखेरीस सेवानिवृत्ती वेतन दिले जात असल्याने ज्येष्ठांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कलिंगडांना मागणी
रत्नागिरी : उष्मा वाढल्याने कलिंगडांना विशेष मागणी होत आहे. १५ ते २० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. अखंड तसेच कापलेल्या कलिंगडाचा खप होत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील कलिंगड विक्रेत्यांनी स्टाॅल लावले आहेत. कलिंगडासह पपई विक्री करण्यात येत आहे.
गाळ काढण्यास प्रारंभ
देवरूख : संगमेश्वर तालुक्यासह चिपळूण तालुक्यातील सय्यदवाडी, कोंडफणसवणे नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. सय्यदवाडीतील १८ घरांना पुराचा धोका असल्याने दोन कोटी ८३ लाखांची संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माकडांचा उपद्रव
टेंभ्ये : सध्या आंबा, काजूचा हंगाम सुरू झाला आहे. शिवाय बागायतीमधील भाज्या तयार होत आहेत. मात्र, वानर, माकडांचा उपद्रव वाढल्याने बागायतींचे नुकसान करीत आहेत. तयार फळे काढून खाऊन फेकत आहेत. वानरांपासून तसेच अन्य वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी दिवस-रात्र पहारा ठेवावा लागत आहे.
शीतपेयांकडे पाठ
रत्नागिरी : कोरोना रुग्णवाढीचा धसका पुन्हा नागरिकांनी घेतला आहे. उष्मा वाढला असला तरी शीतपेय सेवनाकडे पाठ फिरवली असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. शीतपेयासह आइस्क्रीमचाही खप मंदावला असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
गणपतीपुळेत गर्दी
गणपतीपुळे : शनिवार, रविवार तसेच होळीची जोडून सुट्टी आल्याने गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. जिल्हालगतचे पर्यटक एका दिवसात परत फिरत आहेत. गणपतीपुळेसह आरेवारे बीच, काजीरभाटी बीचवर पर्यटक येता-जाता थांबत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत.
आरोग्य केंद्रास भेट
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रास चिपळूण तालुका पंचायत समिती सभापती पांडुरंग माळी यांनी भेट दिली. कोरोना तपासणी व लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेही डाॅ. अंकुश यादव तसेच अन्य आरोग्य कर्मचारीवृंद उपस्थित होते.
वधू-वर सूचक पालक मेळावा
चिपळूण : तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे रविवार, दि. ३० मे रोजी वधू-वर सूचक पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचचे अन्वर पेचकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ६ या वेळेत मेळावा होणार आहे.