गुहागर तालुक्यात वडिलांच्या स्मरणार्थ मोफत सार्वजनिक शौचालय
By Admin | Updated: March 13, 2017 14:07 IST2017-03-13T14:07:57+5:302017-03-13T14:07:57+5:30
स्वखर्चाने उभारणी,लोकार्पण सोहळा

गुहागर तालुक्यात वडिलांच्या स्मरणार्थ मोफत सार्वजनिक शौचालय
वडिलांच्या स्मरणार्थ उभारले
मोफत सार्वजनिक शौचालय
असगोली : आपल्या आप्ताच्या स्मरणार्थ कोणी शाळेसाठी देणगी देतं, कुणी विद्यार्थ्यांना दत्तक घेतं, कुणी एखादं सभागृह बनवतं. पण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील नूरमहम्मद अब्बास बोट यांनी आपले वडील स्व. अब्बास हाजी इब्राहीम बोट यांच्या स्मरणार्थ चक्क जनतेसाठी स्वखर्चाने मोफत सुलभ शौचालयाची उभारणी करून नवा आदर्श उभा केला आहे. या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
गुहागर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून शृंगारतळीकडे पाहिले जाते. मात्र येथे शौचालयासाठी कोठेच जागा मिळत नसल्याने गैरसोय होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी पाटपन्हाळेचे उपसरपंच संजय पवार यांनी अनेकांकडे जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान नूरमहम्मद अब्बास बोट यांनी वेळंब फाटा येथे असलेल्या स्वत:च्या जागेत नदीवरील पुलाच्या बाजूला महिला व पुुरुषांसाठी स्वतंत्र विभाग असलेल्या सुलभ शौचालयाची उभारणी केली आहे. याचा लोकार्पण सोहळा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता भेकरे व सुचिता वेल्हाळ यांच्याहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी उपसरपंच संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य सृष्टी चव्हाण, दिनेश चव्हाण, पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल, यासीन साटरे, जावेद केळकर उपस्थित होते. (वार्ताहर)