बीपीएलधारकांना मोफत गॅस
By Admin | Updated: July 23, 2016 00:23 IST2016-07-22T22:45:10+5:302016-07-23T00:23:24+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : गॅस वापरण्याचे स्वप्न होणार पूर्ण

बीपीएलधारकांना मोफत गॅस
लांजा : दारिद्र्यरेषेखालील ज्या नागरिकांकडे अजूनही गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकाधारक महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे गॅस घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, अशी माहिती लांजा येथील पोकलेकर गॅस एजन्सीजच्यावतीने देण्यात आली.
सध्या नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असल्यास डिपॉझिटसह साधारण चार हजार रूपयांपेक्षा अधिक खर्च येतो. एवढे करूनही प्रतीक्षा यादीत नंबर लावावा लागतो. पैशांची अडचण, गॅस कनेक्शनच्या जाचक अटी यामुळे ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील अनेक शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडण्या नाहीत. ते वर्षांनुवर्षे स्वयंपाकासाठी स्टोव्ह, मातीच्या चुलीचाच वापर करत आहेत. या नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला’ ही नवी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलावर्गाला गॅस कनेक्शन मिळणे सोपे होणार असून, चुलीतील धुराच्या लोळापासून सुटका होणार आहे.
या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका असलेल्या महिलांच्या नावे गॅस जोडण्या नसल्यास त्यांना नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत एक सिलिंडर, एक रेग्युलेटर, सुरक्षा पाईप मिळणार आहे. याच्या डिपॉझिटसाठी लागणारे १६०० रूपयेही ग्राहकांकडून आकारण्यात येणार नाहीत. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी ही योजना १०० टक्के मोफत आहे. जर दोन बर्नरची पीएमयुवाय स्पेशल गॅस शेगडी ही पहिल्या गॅस डिलिव्हरीवेळी आर्थिक सहाय्यावर हवी असेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन भारत गॅसजोडणीवेळी केवळ १०० रूपयांच्या मुद्रांकावर ही योजना घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. अत्यल्प दरात गॅस कनेक्शन मिळणार असल्याने दारिद्र्यरेषेखालील महिलांना सरकारने आधार दिला अ आहे. (प्रतिनिधी)
ग्राहकांनी लाभ घ्यावा
बीपीएल शिधापत्रिकाधारक महिलांच्या नावावर या योजनेंतर्गत १०० टक्के मोफत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बीपीएल प्रमाणपत्र, फोटो आवश्यक आहेत. यासाठी पोकलेकर गॅस एजन्सीकडे संपर्क साधावा. केंद्र सरकारच्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.