पेठमापमधील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: November 12, 2014 23:30 IST2014-11-12T21:05:34+5:302014-11-12T23:30:58+5:30
चिपळूण पालिका : ग्रामस्थांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी फेटाळली

पेठमापमधील स्मशानभूमीचा मार्ग मोकळा
चिपळूण : पेठमाप येथे स्मशानभूमी व्हावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही झाली होती. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली व स्मशानभूमीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केला. तशा आशयाचे पत्र चिपळूण नगर परिषदेला देण्यात आले आहे.
पेठमाप जुन्या मराठी शाळेजवळ वाशिष्ठी नदीकिनारी गाळाने भरलेल्या जागेवर स्मशानभूमी व्हावी, यासाठी येथील हिंदू बांधवांनी नगर परिषदेकडे मागणी केली होती. याविरोधात तेथील काही रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. सर्व बाजू पडताळून पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज फेटाळून लावला व ग्रामस्थांची मागणी मान्य केली.
पेठमाप येथे वाशिष्ठी नदीच्या पलिकडे हिंदूंसाठी स्मशानभूमी आहे. नदीला पाणी आल्यानंतर किंवा पावसाळ्यात या स्मशानभूमीत जाणे अवघड असते. शिवाय पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जुन्या मराठी शाळेजवळील जागेत स्मशानभूमी असावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून, स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे तक्रारदारांनीही सामंजस्याने या स्मशानभूमीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा सकारात्मक विचार केल्याने ही स्मशानभूमी लवकरच मार्गी लागणार आहे. या स्मशानभूमीसाठी असलेल्या जागेला सिटी सर्व्हे क्रमांक मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सिटी सर्व्हे कार्यालयाला पत्र दिले आहे. नगर परिषदेकडूनही याबाबतची कार्यवाही लवकर पूर्ण करुन नागरिकांना सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
पेठमाप येथे स्मशानभूमीची केली होती मागणी.
मागणी मान्य झाल्याने पेठमाप ग्रामस्थ समाधानी.
जुन्या मराठी शाळेजवळ गाळाने तयार झालेल्या भूभागावर होणार स्मशानभूमी.
सिटी सर्व्हे नंबर मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली
कार्यवाही.