बनावट दाखल्यांचा तपास थंडावला !
By Admin | Updated: February 15, 2015 23:39 IST2015-02-15T22:22:33+5:302015-02-15T23:39:38+5:30
प्रांताधिकारी कार्यालय : तपासप्रकरणात राजकीय दबाव ?

बनावट दाखल्यांचा तपास थंडावला !
राजापूर : राष्ट्रीयत्त्वाच्या दाखल्यांवर प्रांताधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून वितरीत केल्याच्या घटनेचा राजापूर पोलिसांचा तपास कासवाच्या गतीने सुरु असून याप्रकरणात राजकीय दबाव येत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमधून करण्यात येत आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून असे खोटे दाखले देण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा सर्वत्र सुरु असताना, सहा महिन्यांपूर्वी हरवलेले सिल पाहता याप्रकरणी संशयाच्या सुया आता अधिकाऱ्यांकडे वळू लागल्या आहेत. मागील आठवड्यात हे प्रकरण घडल्यानंतर संशयित आरोपी म्हणून महा ई-सेवा केंद्र राजापूर नं. ३ मधील कर्मचारी आशिष अरुण शिवणेकर याच्याविरोधात राजापूर पोलिसांत गुहा दाखल झाला होता.त्यानंतर तिसऱ्या दिवशी राजापूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंंतर या प्रकरणाच्या तपासात म्हणावी, तशी प्रगती झालेली नसून सहा महिन्यांपूर्वी प्रांतांचे गहाळ झालेले व याप्रकरणात वापरण्यात आलेले सील अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. हे दाखले बनवण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाहीत. केवळ रजिस्टर ताब्यात घेणे व महा ई - सेवा केंद्र राजापूर नं. ३ मधील इतर कर्मचाऱ्यांचे जबाब घेणे, यापलीकडे पोलिसांचा तपास गेलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमधून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी राजापूर पोलीस फक्त तपास चालू आहे, असे ठेवणीतले उत्तर देऊन आपली बाजू मारून नेत आहेत व याप्रकरणातील सत्य सर्वसामांन्यापासून लपवत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे.
जातीचे दाखले, राष्ट्रीयत्त्वाचे दाखले व विविध शासकीय दाखले गेले वर्षभर महा-ई सेवा केंद्र व सेतू कार्यालयातून वेळेवर मिळत नव्हते. साहेबांच्या सह्या झालेल्या नाहीत. एका कारणास्तव अनेक लाभार्थ्यांचे दाखले धुळ खात पडून होते. त्यामुळे दाखल्यांसाठीची ओरड कायम होती. त्यातच दाखल केलेल्या दाखल्यांसाठीच्या प्रकरणात अनेक त्रुटी निघून आज निकाली निघण्याचे प्रमाणही अधिक होते. मात्र याच एका महा ई-सेवा केंद्र्रावर चार पाच दिवसात विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळत असत. मात्र त्यासाठी जास्तीचा मोबदला घेतला जायचा, अशी चर्चाही आता सर्वत्र खुलेआमपणे सुरु आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी व काही दलाल यांची टोळीच या प्रकरणात सामील असल्याचा संशय सर्वसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिशय मंद गतीने सुरुअसून यातील दबावापोटीच सर्व यंत्रणा हाताची घडी घालून बसलेली आहे. प्रांतांनी आपली बाजू मारून नेताना आपण निवासी नायब तहसिलदार बिर्जे यांना महा ई- सेवा केंद्र्र राजापूर नं. ३ व तेथील कर्मचारी आशिष शिवणेकर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे शनिवारी स्पष्ट केल्यामुळे, आता याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चांना ऊत आला
आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागलेले नाही, तर पोलीस अद्यापही संबधित प्रकरणातील प्रांताचे सिल हस्तगत करण्यात अपयशी ठरलेले आहेत. पोलिसांच्या तपासात ठोस असे काहीच सापडत नसल्यामुळे पोलीस तपासाबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)