बस अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली
By Admin | Updated: May 16, 2014 00:28 IST2014-05-16T00:27:27+5:302014-05-16T00:28:32+5:30
रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे)

बस अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली
रत्नागिरी : पालीजवळील नागलेवाडीत बुधवारी ट्रकने बसला दिलेल्या टक्करमुळे झालेल्या अपघातातील चौथ्या मृताची ओळख पटली असून, हरिश्चंद्र धकटू कोटकर (४०, दाभोळे) असे या मृताचे नाव आहे. या अपघातात कोटकर यांच्यासह सुनीता शंकर गार्डी (५५, रा. देवळे) गायत्री दीपक भालेराव (१३, लोणार) व सुचिता चंद्रकांत शिवगण (नाणीज) हे मृत्युमुखी पडले होते. बुधवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नागलेवाडी येथे गोव्याहून भरधाव येणार्या ट्रकने एस. टी.ला जोरदार धडक दिली होती. रत्नागिरी -कोल्हापूर बसचा चालकाच्या बाजूकडील भाग कापला गेला होता. या अपघातामुळे पालीपर्यंत व हातखंब्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती. ट्रक व बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. घटनास्थळाचे चित्र हे काळजाचा थरकाप उडविणारे होते. ट्रकच्या ठोकरीनंतर बस पाठीमागे फेकली गेली. त्यामुळे पाठीमागून असणार्या स्कॉर्पिओ व स्वीफ्ट या गाड्यांवर बस जाऊन आदळली होती. परिणामी त्या दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले होते. सदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज नाणीज संस्थानच्या गाडीने मृत व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. बसमधील गायत्री भालेराव ही १३ वर्षांची मुलगी अपघातात ठार झाली होती. ती बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने तिचे नातेवाईक आज रत्नागिरीत दाखल झाले. गायत्रीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी टाहो फोडला. गायत्रीचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री तिच्या नातेवाईकांनी लोणार (जि. बुलडाणा) येथे हलविला. उद्या तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत, असे तिच्या रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)