चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आता घराजवळ नोकरी
By Admin | Updated: December 10, 2015 00:55 IST2015-12-10T00:27:13+5:302015-12-10T00:55:03+5:30
समाधानाचे वातावरण : कृषी विद्यापीठाचे सकारात्मक पाऊल

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आता घराजवळ नोकरी
दापोली : कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगले काम करून आपल्या कुटुंबाची काळजी घेता यावी, यासाठी राज्य शासनाने यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना विभागवार नोकऱ्या देण्याचा विचार सुरू केला असताना दापोली कोकण कृषी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत कृषी विद्यापीठातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घराजवळ नोकरी देण्यास सुरुवात केली आहे. कमी पगारात कुटुंबाचा भार हलका होण्यासाठी घराजवळ नोकरी देण्याचे धाडस नवनिर्वाचित कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दाखवले आहे.
डॉ. भट्टाचार्य यांनी ६ नोव्हेंबर २०१५ रोजी कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला झपाट्याने गती देण्याचा प्रयत्न केला. कारण ११ महिने प्रभारी कुलगुरू असल्याने या विद्यापीठातील अनेक कामे प्रलंबित होती. गेल्या अनेक वर्षांच्या फाईलवरील धूळ झटकून कुलगुरु डॉ. भट्टाचार्य यांनी अवघ्या आठ दिवसात अनुकंपाधारकांना आदेश देऊन दिलासा दिला.
अनुकंपातत्त्वावरील १४ कर्मचाऱ्यांना घरापासून जवळच काम देऊन त्यांना सुखद धक्का देण्याचा उत्तम प्रयत्न विद्यापीठाकडून केला गेला. त्यानंतर लगेच रोजंदारी मजुरांचा प्रश्न निकाली काढण्यास सुरुवात झाली आहे. ३३५पैकी १०४ रोजंदारी मजुरांना कामावर कायमस्वरुपी रूजू करुन घेताना कटाक्षाने त्यांच्या घरापासून जवळच त्यांना काम देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. १०४ रोजंदारी मजुरांना सामावून घेताना त्यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला आहे. उर्वरित २३१ रोजंदारी मजुरांना रिक्त पदानुसार कामावर कायम करुन घेतले जाणार आहे. तसेच अनुकंपाधारकांच्या दुसऱ्या यादीतील अर्जदारांना येत्या जानेवारीत सामावून घेतले जाणार आहे. यांनासुद्धा घराजवळच काम देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वाढती महागाई व चतुर्थ कर्मचाऱ्याचा असलेला तूटपुंजा पगार याचा मेळ बसत नसल्याने अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी कर्जबाजारी होताना दिसतात. मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहिल्यास कुटुंबाच्या समस्याने ग्रासलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांना घरापासून दूरच्या ठिकाणी कामावर हजर करुन घेऊन त्याला सोयीच्या ठिकाणी बदली हवी असल्यास अनेक ठिकाणी पैशांचा घोडाबाजार केला जातो. शासकीय कार्यालयात बदल्यांचा चालणारा घोडाबाजार रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असताना दापोली कोकण कृषी विद्यापीठाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घरापासून जवळच काम देऊन मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
अखेर मिळाला न्याय : कर्मचाऱ्याची आत्महत्या
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कमी पगार, कामाचा ताण, कुटुंबाच्या विवंचनेमुळे कामाच्या ठिकाणी कामावर परिणाम होऊ नये. कुटुंबासोबत गोष्टी साध्य होणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने चतुर्थ कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दापोली कृषी विद्यापीठातील एका कर्मचारी बदली घरापासून लांब झाली होती. ती बदली रद्द करण्याची विनंती त्या कर्मचाऱ्याने तत्कालीन कुलगुरु डॉ. विजय मेहता यांच्याकडे केली होती. परंतु बदल रद्द न झाल्याने त्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ४ वर्षांपूर्वी याच विद्यापीठात घडली होती.
कामात चांगला बदल होण्याची आशा
ओळखीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून यापूर्वी कर्मचारी, अधिकारी यांना गावापासून दूर पाठवले जात होते. परंतु आता त्यांच्या कुटुंबाची काळजी म्हणून पुन्हा त्यांना घरापासून जवळच नोकरी दिल्यास कामात चांगला बदल होण्याची अपेक्षा कृषी विद्यापीठाला आहे.