चौपदरीकरणविरोधी उद्या लांजा शहर बंद
By Admin | Updated: July 27, 2015 00:20 IST2015-07-26T22:20:04+5:302015-07-27T00:20:31+5:30
व्यापारी आक्रमक : प्रशासनाचा करणार निषेध

चौपदरीकरणविरोधी उद्या लांजा शहर बंद
लांजा : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे येथील ८० ते ८५ टक्के व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. तरीसुद्धा शासन व प्रशासन येथील व्यापाऱ्यांच्या भावनांची कदर न करता आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवार, दि. २८ जुलै रोजी मोजणी करत असल्याने शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून लांजा बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
लांजा बाजारपेठेच्या मध्यभागातून मुंबई - गोवा महामार्ग जात असल्याने महामार्गालगत असणारे छोटे - मोठे व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. तसेच शहराचे दोन भाग या महामार्गामुळे होणार असल्याने मुंबई - गोवा महामार्ग संघर्ष कृती समितीने शनिवारी वक्रतुंड मंगल कार्यालय येथे सर्व बाधित व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, कृती समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी, सचिव विजय खवळे, नगराध्यक्षा संपदा वाघदरे, जयवंत शेट्ये, भाऊ वंजारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन माजलकर, समितीचे उपाध्यक्ष खलील मणेर, नगरसेवक अनिल गुरव, मंगेश खवळे, प्रकाश लांजेकर, श्रीराम जंगम, परवेज घारे, प्रेमनाथ नारकर, संजय बावधनकर, सुधाकर शेट्ये, हेमंत शेट्ये, प्रभाकर शेट्ये, सचिन भिंगार्डे, अॅड. सुमंत वाघदरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी शहरातील जवळजवळ २०० व्यापारी उपस्थित होते.
उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृती समितीचे अध्यक्ष महंमद रखांगी म्हणाले की, शासन - प्रशासन जबरदस्तीने ही मोजणी करत आहे. त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनी सहभाग घेऊन लांजा शहर १०० टक्के बंद ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लोकशाही मानणारे आपण सारे लोक आहोत. त्यामुळे सनदशीर मार्गाने आपण हा बंद पुकारायचा आहे. सध्या हा चौपदरी असला तरी भविष्यात ६ किंवा ८ पदरी होणार असल्याने येथील व्यापारी, घरमालक यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यावेळी प्रकाश लांजेकर, सचिन माजळकर, बबन स्वामी व शेवटी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी बंदसंदर्भात माहिती दिली. मंगळवारी होणाऱ्या आंदोलनाला सकाळी ९.३० वाजता प्रसन्न हॉटेल येथून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)