चार आण्यातील ‘ती’ जगण्याची परीक्षा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 00:19 IST2015-08-11T00:19:09+5:302015-08-11T00:19:09+5:30
आख्यायिकेचा प्रवास : गंगाराम गवाणकर; ठेचाळलेल्या जीवनातील कडू-गोड आठवणी...

चार आण्यातील ‘ती’ जगण्याची परीक्षा...!
राजापूर : त्या काळात घरात गरिबी पाचवीला पुजलेली. आईने दिलेल्या चार आण्यातच मी जेवण-खाणं, राहणं इथपासून ते अगदी अभ्यासापर्यंतचा सारा खर्च भागवत असे ते दिवस अन् ते पाचवीला पुजलेले दारिद्र्य आताही आठवलं तरी डोळ्यात अश्रू उभे राहतात... अशा शब्दात वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी आपल्या जीवन संघर्षाचं इंगित सांगितलं.
निमित्त होतं राजापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगाने झेप घेणाऱ्या ‘शर्मद’ संस्थेतर्फे आयोजित ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या ‘मुंबई ते लंडन-व्हाया वस्त्रहरण’ या एका आख्यायिकाचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या ‘मालवणी’तील भावसंवाद कार्यक्रमाचे. त्या जोडीलाच सादर झालेल्या आनंद बोंद्रे यांच्या ’संगमेश्वरी’ कथाकथनाने राजापूरकर रसिकांना तीन तास खीळवून ठेवताना पोट धरून हसायला भाग पाडले. राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात तुडुंब गर्दी करत कोकण प्रांतातील ‘मालवणी’ आणि ‘संगमेश्वरी’ भाषेतील खुमासदार बतावणीला उत्स्फूर्त दाद दिली. गंगाराम गवाणकर, आकाशवाणी निवेदिका अनुया बाम, शर्मदचे अध्यक्ष चंदुभाई देशपांडे, कार्याध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार व सदस्यांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. प्रारंभीच गवाणकर यांचा चंदुभाई देशपांडे यांच्या हस्ते, सौ. अनुया बाम यांचा शर्मदचे सदस्य डॉ. सागर पाटील यांच्या हस्ते, तर आनंद बोंद्रे यांचा अॅड. यशवंत कावतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गवाणकरांनी वस्त्रहरणचा ‘मुंबई ते लंडन’ प्रवास उलगडताना सुरूवातीपासून शेवटपर्यंत धम्माल गंमती सांगत वस्त्रहरणची गोष्ट अनुया बाम यांच्या साथीने झक्कास सादर केली. त्यांच्या धम्माल विनोदी किश्श्यांनी अनेक ठिकाणी रसिकांना हसता हसता पुरेवाट झाली. वस्त्रहरणची जन्मकथा सांगताना त्याचं श्रेय त्यांनी बालपणीच्या नाट्यसंस्कारांना दिलं. ते म्हणाले, ‘बालपणी पाहिलेल्या पारावरच्या नाटकातून मला प्रेरणा मिळाली. कोकणातील माणसांना नाटकाचं प्रचंड वेड. पण, अपुरी साधनसामग्री असल्यामुळे नाटकाच्या वेळी भन्नाट गमती - जमती घडतं. त्यातून वस्त्रहरणचा जन्म झाला.
आयुष्यातल्या हलाखीनं मला जीवन जगण्याची जिद्द दिली असं त्यांनी. यावेळी बोलताना सांगितलं. लहान असताना वडील सोडून गेले. वडिलांना शोधत मुंबईत आलो. वडिलांचा शोध घेतल्यावर संघर्षाचा आणि आयुष्याचा शोध लागला. ते म्हणाले की, मी त्यांना कधीच पाहिलेलं नव्हतं. मी आईकडे हट्ट करून बाबांना भेटायला गातवातल्या माणसाबरोबर मुंबईत गेलो. अत्यंत बिकट परिस्थितीत ते राहात होते. सुरुवातीला त्यांनी फटकारले. पण, ठेवून घेतले. चार बाय सहाची खोली... उंदरापासून संरक्षण म्हणून पोत्यात पाय बांधून झोपावं लागे. पण काहीही झालं तरी शिक्षण घ्यायचं, हरायचं नाही, अशी जिद्द मनात होती. तिथल्या प्रतिकूल परिस्थितीने माझा निर्धार पक्का केला. अशा शब्दात गवाणकर आपला संघर्ष मांडीत होते आणि रसिक अचंबीत होत होते. या संघर्षमय प्रवासात भेटलेल्या प्रभुंतीनी जीवन जगण्याचं बळ दिलं. दहावी, अकरावीत असताना वि. स. खांडेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भेट झाली. खांडेकरांनी माझ्यातली शिक्षणाची जिद्द पाहून मला मनापासून आशीर्वाद दिला. मला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. परंतु मी जिद्दीने उभा राहिलो. रात्रशाळेत शिकून शिक्षण घेतलं, ते सांगत होते.
कोकणची मानसिकता, इथली विसंगती, उद्भवणारी परिस्थिती घडणाऱ्या गमतीजमती संगमेश्वरी ठसक्यात सादर केल्या. कोकणची वैशिष्ट्ये सामावणारी कविताही त्यांनी साभिनय सादर केली. कोकणी गीतातून त्यांनी वैशिष्ट्ये, इथल्या थोर व्यक्ती, स्थळ, चांगूलपणा सादर केला. संगमेश्वरी बोलीतील गाऱ्हाणे ठेक्यात सादर करत रसिकांची दाद मिळवली. आपल्या भाषेचा गोडवा मांडताना आनंद बोंद्रे यांनी भाषेवर, कोकणावर प्रेम करण्याचा संदेश दिला. आपली भाषा, संस्कृती, परंपराचा अभिमान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले. अत्यंत जिवंत सादरीकरणातून त्यांनी रसिकांना खळखळून हसवले. प्रारंभी अॅड. शशिकांत सुतार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
वस्त्रहरण संपलंच नाही...!
वस्त्रहरण चालत नव्हतं तेव्हा साठावा प्रयोग करून संपवायचं, असं ठरवलं आणि पुण्याच्या टिळक मंदिरात प्रयोग लावला. प्रयोगाला पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, वसंतराव देशपांडे आलेले. या दिग्ग्जांसमोर हा प्रयोग करायचं मोठं आव्हान होतं. मच्छिंद्र आणि मी आमच्या पोटात गोळा आला. धीर केला आणि नाटकाचा बार उडवून दिला. प्रयोग संपल्यावर पु. ल. आत आले आणि त्यांनी नाटकाची प्रचंड तारीफ केली. त्यानंतर वस्त्रहरणने मागे वळून पाहिले नाही. जिथे तीन हजारचा गल्ला जमत नव्हता, तिथे आम्ही आठशे प्रयोग केले आणि तेव्हा वस्त्रहरण सातासमुद्रापार लंडनला नेण्याचा निर्णय घेतला. परंतु परदेशी जायचे, तर पैसे हवे म्हणून डॉ. काशिनाथ घाणेकर, सचिन पिळगावकर, दिलीप प्रभावळकर अशा दिग्गज कलाकारांना घेऊन वस्त्रहरणाचा प्रयोग केला आणि पैसे उभे केले.