भूमी अभिलेख खात्यात चार पदे अद्याप रिक्तच

By Admin | Updated: July 18, 2016 00:02 IST2016-07-17T23:59:06+5:302016-07-18T00:02:26+5:30

संगमेश्वर तालुका : उपअधीक्षकांचा कार्यभारही प्रभारींवर

Four posts in the Land Records account are still empty | भूमी अभिलेख खात्यात चार पदे अद्याप रिक्तच

भूमी अभिलेख खात्यात चार पदे अद्याप रिक्तच

देवरूख : संगमेश्वर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात विविध ४ पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. उपअधीक्षक पदाचा कार्यभारही प्रभाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याने कामे रेंगाळली आहेत. ही पदे लवकरात लवकर भरावतीत, अशी मागणी होत आहे.
कार्यालयातील उपअधीक्षकांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. या पदाचा पदभार रत्नागिरी येथील भूमापन अधिकारी एस. एस. खांडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आठवड्यातील एक दिवस मंगळवारी खांडेकर देवरूख कार्यालयात हजर असतात. नियोजित दिवशी एखादी बैठक लागल्यास त्याही दिवशी अनुपस्थित राहतात. यामुळे कामे जैसे थे स्थितीत राहात आहेत. याचा त्रास तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतो. एखाद्या कामाचा निपटारा करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लोटत असल्याने ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू आहे.
नकला काढण्यासाठी प्रतिलिपी लिपीक पद आहे. मात्र, देवरूख कार्यालयातील हे महत्त्वाचे पद गेली अनेक वर्षे रिक्त आहे. याचप्रमाणे आवक - जावक लिपीक १ पद, शिपाई १ पद, शिरस्तेदार १ पद रिक्त आहे. या रिक्तपदांमुळे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. काही कर्मचारी प्रशिक्षणासाठी काढण्यात आले आहेत, तर काही कर्मचारी आजारी असल्याने रजेवर असल्याने हे कार्यालय कधीकधी सुनेसुने दिसून येते. सध्या जमीन खरेदी करणे, विक्री करण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. दलालांना यामुळे खुराक मिळतो. पदे रिक्त असल्याने कामे पूर्णत्त्वास जाण्यास कालावधी लोटत असल्याने तेही हिरमुसले आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Four posts in the Land Records account are still empty