जिल्ह्यातील चार ग्रामसेवक निलंबित
By Admin | Updated: June 25, 2014 00:49 IST2014-06-25T00:43:12+5:302014-06-25T00:49:56+5:30
जिल्हा परिषदेची कारवाई : कामातील हलगर्जीपणा नडला, अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

जिल्ह्यातील चार ग्रामसेवक निलंबित
रत्नागिरी : जन्म-मृत्यू व नमुना ८च्या संगणकीय नोंदणी प्रमाणित करावयाच्या कामात पूर्णत: हलगर्जीपणा केलेल्या चार ग्रामसेवकांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. काळम यांनी पत्रकार परिषदेत दिली. शून्य काम करणारे जे ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दिसले नाहीत, त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे काळम यांनी स्पष्ट केले.
ज्या चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, त्यांत जी. बी. भोसले (शिंगारपूर/निवळी, ता. संगमेश्वर), सचिन
पांडुरंग राठोड (नांदगाव, चिपळूण), महेश अनंत
नक्षे (नांदगाव, खेड) व ए. डी. शिंदे (हातिप, ता. दापोली) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात या कामात आणखीही अनेक ग्रामसेवकांनी अत्यंत अल्प काम केल्याचे पुढे आले आहे. त्यांनाही समज देण्यात आली आहे. (पान ५ वर)गेल्या दोन महिन्यांत काहीही तांत्रिक अडचण नसताना हे काम पूर्ण झाले नसल्यानेच ही कारवाई करण्यात आली.
काही ग्रामसेवकांनी जन्म-मृत्यू व नमुना ८ या संग्राम सॉफ्टमधील नोंदणी प्रमाणित करण्याच्या कामात अत्यंत चांगले व अभिनंदनीय काम केले आहे. त्यांत श्रीमती राखी भगवान भाटकर (साडवली, ता. संगमेश्वर), चंद्रमुनी शामराव शिंदे (कोसुुंब, ता. संगमेश्वर), हेमंत सखाराम पवार (अडरे, चिपळूण), जगन्नाथ वासुदेव झोपडे (हर्णै, ता. दापोली) व गौतम दामू केदार (लोटे, ता. खेड) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
कोणालाही माफी नाही
या कामात ज्यांनी-ज्यांनी हलगर्जीपणा केला आहे, त्यांनी हे काम तातडीने पूर्ण न केल्यास त्यांना माफी नाही. हलगर्जीपणा करणाऱ्यास सोडणार नाही, असा इशाराच काळम यांनी दिला.
अन् रातोरात काम फत्ते!
ज्या चार ग्रामसेवकांना निलंबित केले आहे, त्यांतील दोघांनी काल, सोमवारी रातोरात जन्म-मृत्यू व नमुना ८ची नोंदणी काम पूर्ण करून ते आज, मंगळवारी दाखवायला आणले. त्यामुळे त्यांच्या निलंबनावर परिणाम होणार नाही; परंतु जे काम दोन महिन्यांत जमले नाही, ते रातोरात होऊ शकते, ही बाबही पुढे आल्याचे काळम म्हणाले.