नीलेश राणेंसह चौघांना अटक
By Admin | Updated: May 14, 2014 00:30 IST2014-05-14T00:28:46+5:302014-05-14T00:30:30+5:30
चिपळूण : असुर्डे येथे रेल्वे टॅकवर राजधानी एक्स्प्रेस अडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार नीलेश राणे यांच्यासह अन्य तिघांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांनी अटक केली.

नीलेश राणेंसह चौघांना अटक
चिपळूण : असुर्डे येथे रेल्वे टॅकवर राजधानी एक्स्प्रेस अडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार नीलेश राणे यांच्यासह अन्य तिघांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांनी अटक केली. त्यांचा लगेच जामीनही मंजूर झाला. असुर्डे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे खासदार नीलेश राणे यांनी १४ आॅगस्ट २०१२ मध्ये रेल रोको आंदोलन केले होते. यावेळी खासदार नीलेश नारायण राणे, माजी आमदार गणपत दौलत कदम, माजी आमदार सुभाष शांताराम बने व इरशाद कमरुद्दिन वांगडे यांनी राजधानी एक्स्प्रेस अडविण्याचा प्रयत्न केला. या आरोपाखाली त्यांच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात आॅगस्ट २०१२मध्ये गुन्हा दाखल झाला होता. असुर्डे येथे रेल्वे स्टेशन व्हावे, यासाठी राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. यात रेल्वे अडविण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यानंतर पोलिसांनी धरपकड केली होती. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. असुर्डे रेल्वेस्थानक झालेच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या प्रकरणी आज (सोमवार) चौघांना डॉ. काळे यांनी अटक करुन चिपळूण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)