हरपुडेवासियांच्या नशिबी पायपीट
By Admin | Updated: October 9, 2015 21:18 IST2015-10-09T21:18:22+5:302015-10-09T21:18:22+5:30
संगमेश्वर तालुका : स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

हरपुडेवासियांच्या नशिबी पायपीट
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावात स्वतंत्र बसफेरी नसल्याने येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना यांना पायपीट करावी लागत आहे. हरपुडे गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने देवरूख आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देवरूखपासून ५ किलोमीटर अंतरावर हरपुडे गाव वसलेले आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी देवरूखात यावे लागते. सुमारे १०० विद्यार्थी देवरूख महाविद्यालय, आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक ६५ आहे. ५ कि. मी. पैकी ३ कि. मी. अंतर हे निर्मनुष्य आहे.येथील ग्रामस्थही पोटाची खळगी भरण्यासाठी कामानिमित्त देवरूख येथेच येतात. बसफेरी नसल्याने नाईलाजास्तव पायपीट करण्याची वेळ विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांवर येत आहे. देवरूख आगारातून सकाळी ७ वाजता सुटणारी देवरूख- कुंडी बसफेरी येताना हरपुडे मार्गे येते. ही गाडी हरपुडे येथे सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास येते. ही गाडी कुंडी, बेलारी, तामनाळे, निगुरवाडी येथील प्रवासी, विद्यार्थ्यांनी खचाखच भरून येते.गाडी फुल्ल असल्याने ती हरपुडे येथे थांबतच नाही. या मार्गावर अन्य बसफेरी नाही. दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या परतीच्या पावसामध्ये हरपुडे शाळेच्या पुढील कॉजवे हा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील सुरू असलेली ही कुंडी बसफेरीही बंद आहे. नाईलाजाने विद्यार्थी, ग्रामस्थ यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
विद्यार्थीवर्गाची परवड थांबण्यासाठी सरपंच विकास आकटे यांनी पुढाकार घेतला आहे. या गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ वाजता, सायंकाळी ५ वाजता, शनिवारी सकाळी ६.४५ वाजता व दुपारी १२ वाजता अशा बसफेऱ्या देवरूख आगारातून सोडण्यात याव्यात अशी मागणी तमाम ग्रामस्थांची आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच आगार व्यवस्थापक दिलीपकुमार साळवी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यावर साळवी यांनी हरपुडे वासियांनी केलेली मागणी रास्त आहे. बसफेरी सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवण्यात आला असल्याचे साळवी यांनी सांगितले. (वार्ताहर)