मे महिन्याचा पंधरवडा उलटताच उष्म्याने केले उग्र रूप धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:37+5:302021-05-11T04:33:37+5:30
रत्नागिरी : कोरोनाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच आता मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटू लागताच उष्म्याने अधिक उग्र रूप धारण ...

मे महिन्याचा पंधरवडा उलटताच उष्म्याने केले उग्र रूप धारण
रत्नागिरी : कोरोनाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच आता मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटू लागताच उष्म्याने अधिक उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा अधिकच वाढू लागला आहे. त्यातच अधून-मधून मळभाचे वातावरण निर्माण होत असून जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये काही भागांत किरकोळ तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, काही भागांत पाऊस न पडता केवळ मळभच असते. त्यामुळे उकाड्यात अधिक वाढ होऊ लागली आहे. सध्या तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअस एवढा आहे. मात्र, हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणावर असल्याने उकाड्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले आहे.
सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने नागरिक घरात आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेल्या ठराविक व्यक्तींना बाहेर पडण्यास सवलत आहे. त्यामुळे उर्वरित सगळेच नागरिक घरात अडकले आहेत. त्यामुळे घरात उकाड्याचा त्रास अधिक होतो. विशेषत: सोमवारी दिवसभर विद्युत पुरवठा काही वेळा सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना घरात राहाणे अशक्यप्राय होत आहे. सध्या सर्वत्रच उष्णता अधिकाधीक वाढू लागली आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्राेत आटल्याने अनेक दुर्गम भागांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे. यावर्षी केरळात १ जूनला पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. केरळनंतर आठवडाभरात पाऊस कोकणात दाखल होतो. त्यामुळे सध्याची स्थिती पाहाता मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत.