माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2016 01:14 IST2016-02-27T01:14:06+5:302016-02-27T01:14:06+5:30
माखजन ग्रामपंचायतीमधील वित्त आयोगात ३६ लाखांचा अपहार केल्याची तक्रार

माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी अटकेत
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायती मधील बाराव्या आणि तेराव्या वित्त आयोगातील अपहारप्रकरणी तत्कालिन सरपंच सतीश कुंभार व ग्रामविकास अधिकारी जितेंद्र मांगले यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी मध्यरात्री २.१६ वाजता करण्यात आली. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलानाला या कारवाईमुळे यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनीच हा अपहार झाल्याचे उघड केले होते. मात्र, त्यानंतर कारवाईबाबत विलंब होत होता. यासाठी स्वाभिमान प्रतिष्ठानचे महेश बाष्टे व स्थानिक ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरेंद्र पराते यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
माखजन ग्रामपंचायतीमध्ये बारावे व तेराव्या वित्त आयोगातील रकमेचा अपहार करण्यात आला होता. ग्रामनिधीतून सन २०११-१२ साली झालेल्या ३६ लाख ९६ हजार ४२१ या अंदाजित कामांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसून, त्यांचे मूल्यांकन केले नाही. तत्कालिन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने रस्ते, पायवाट, स्मशानशेड, विहीर व गटारे या विविध कामांसाठी निधी खर्च दाखवला होता. प्रत्यक्षात कामेच झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. ३६ लाखांचा अपहार ग्रामस्थांनी उघडकीस आणल्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत २८ जुलै २०१५ रोजी तत्कालिन सरपंच सतीश कुंभार आणि ग्रामविकास अधिकारी जितेंद्र मांगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही आरोपींना अटक झाली नव्हती. १७ जानेवारी २०१५ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश असतानासुद्धा पंचायत समितीकडून फिर्याद दाखल करण्यास तक्रार दाखल करण्यास ७ महिन्याचा कालावधी लागला. कारवाई होत नाही, हे लक्षात येताच ग्रामस्थांनी पुन्हा २७ जुलै २०१५ रोजी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अटक होत नव्हती म्हणून स्वाभिमान प्रतिष्ठानचे महेश बाष्टे यांनी १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ग्रामस्थांसह पोलीस स्थानकासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)