चरवेली येथे फुडमाॅल उभारणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:15+5:302021-08-22T04:34:15+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक ...

Food mall to be set up at Charveli: Uday Samant | चरवेली येथे फुडमाॅल उभारणार : उदय सामंत

चरवेली येथे फुडमाॅल उभारणार : उदय सामंत

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मुंबई - गाेवा महामार्गाचे काम पू्र्ण हाेताच चरवेली येथे फुडमाॅल उभारून तरुण - तरुणींसाठी राेजगारनिर्मिती केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, चरवेलीचे सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच गजानन नागले उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, या नूतन इमारतीचा उपयोग विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढीलवर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळंबे (ता. संगमेश्वर)च्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पंचायत समिती सदस्य पाटणे, संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रेवणकर, ग्रामपंचायत कोळंबेचे सरपंच रघुनाथ पडवळ उपस्थित होते.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, या सुसज्ज इमारतीमध्ये येणारा येथील प्रत्येक ग्रामस्थ त्याचे काम झाले म्हणून समाधानी झाला पाहिजे. ग्रामस्थांची विकासाची कामे करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतीसमोर संरक्षक भिंत उभारावी, निधी कमी पडल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या शंकर कांबळे, अशोक कांबळे, शांताराम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Food mall to be set up at Charveli: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.