वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूचनांचे पालन करा : प्रतिभा वराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:22+5:302021-09-03T04:32:22+5:30
असगाेली : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाड जनावरांसंदर्भात कायदेशीर कारवाई कशी ...

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूचनांचे पालन करा : प्रतिभा वराळे
असगाेली : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाड जनावरांसंदर्भात कायदेशीर कारवाई कशी करता येईल ते पाहूया. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये आयाेजित केलेल्या शांतता कमिटीच्या सभेत त्यांनी व्यापाऱ्यांना सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शांतता कमिटीची सभा बोलावली होती. या सभेला तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार उपस्थित होते. शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तीन ठिकाणे निश्चित करुन तेथे तात्पुरते रिक्षा स्टॅण्ड बनविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तालुक्यातून येणाऱ्या वडापच्या गाड्या बाजारपेठेबाहेर उभ्या राहतील. क्रमांकाप्रमाणे वडाप वाहतूकदारांनी केवळ ५ गाड्या बाजारपेठेत उभ्या कराव्यात. खासगी प्रवासी बसेस उभ्या करण्यासाठी बाजारपेठ सोडून स्वतंत्र जागा दिली जाईल. बाजारपेठेत दुकानांसमोरील जागेत दुचाकी उभ्या करता येतील, असे सांगण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेला उनाड जनावरांचा त्रासही कारणीभूत ठरतो. त्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. याबाबत गणेशोत्सवापूर्वी निर्णय घेऊ, असे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.
शृंगारतळी बाजारपेठेतील प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क नसणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत करेल, असे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. या बैठकीला नासीम मालाणी, गौरव वेल्हाळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अंगणवाडी सेविका सारिका हळदणकर उपस्थित होते.
------------------------
विनाकारण कोणतेही वाहन शनिवार, ३ सप्टेंबरपासून बाजारपेठेतील रस्त्यावर उभे राहणार नाही, अशी सूचना करण्यात आली. या ठरलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब न करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाई करण्यात येईल, अशी सूचना यावेळी उपनिरीक्षक दीपक कदम यांनी मांडली. त्यावर गौरव वेल्हाळ यांनी या सूचनांची माहिती वडाप, रिक्षा संघटना आणि खासगी प्रवासी बसेस मालक यांना स्वतंत्र बैठकीद्वारे द्याव्यात, अशी सूचना केली.
----------------------
अन्यथा दुकाने उघडता येणार नाही
गणेशोत्सवापूर्वी सर्व व्यापाऱ्यांनी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसह आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. जे दुकानदार चाचणी करणार नाहीत, त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत, असा आदेशच तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिला.