रुग्णालयातील सुविधांबाबत पाठपुरावा करू

By Admin | Updated: June 1, 2015 00:18 IST2015-05-31T22:34:08+5:302015-06-01T00:18:14+5:30

अजित यशवंतराव : प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

Follow up with the facilities in the hospital | रुग्णालयातील सुविधांबाबत पाठपुरावा करू

रुग्णालयातील सुविधांबाबत पाठपुरावा करू

राजापूर : राजापूर ग्रामीण रूग्णालयातील पाणीसमस्येसह ब्लड स्टोरेज युनिट, अपुरा कर्मचारी वर्ग व अन्य सेवासुविधांसाठी आपण स्वत: आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी दिली आहे. ट्रामा केअर युनिट राजापूर ग्रामीण रूग्णालयात व्हावे यासाठीही आपण शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी माहिती यशवंतराव यांनी दिली. अजित यशवंतराव यांनी शनिवारी राजापूर ग्रामीण रूग्णालायला भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकिय अधिक्षक डॉ. उमेश चव्हाण यांच्याशी रूग्णालायतील असुविधांबाबत चर्चा केली. यावेळी डॉ. चव्हाण यांनी सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. रिक्त पदांबाबत आॅगस्ट २०१५ पर्यंत कार्यवाही होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. राजापूर ग्रामीण रूग्णालयासाठी ब्लड स्टोरेज युनिट मंजूर आहे. मात्र विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी जनरेटरची सुविधा नसल्याने हे युनिट कार्यान्वित झाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी शासन स्तरावर जनरेटरचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याएकूणच प्रश्नांची दखल घेत यशवंतराव यांनी आपण या प्रश्नी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत व पालकमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. राजापूर आणि लांजा ग्रामीण रूग्णालयातील असुविधांबाबत आपण लवकरच जिल्हा शल्य चिकित्सकांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर पाण्यासाठी प्रस्तावित बोअरवेलच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठीही आपण प्रयत्न करू असे यशवंतराव यांनी यावेळी सांगितले.
राजापूर आणि लांजा ही दोन्ही ग्रामीण रूग्णालये महामार्गावर असून या ठिकाणी अपघात व अन्य कारणांनी दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शासनाकडून ट्रामा केअर युनिट मंजूर व्हावे यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील या असुविधांबाबत यशवंतराव यांनी दखल घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. राजापूर ग्रामीण रूग्णालयात आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी यशवंतराव यांनी सांगितले.
रक्त संचय, अत्याधुनिक उफचार व्हावेत यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याने आपण या प्रश्नावर लक्ष घालीत आहोत. रिक्त पदांबाबत पाठपुुरावा करण्यात येत असल्याने यावेळी रूग्णालयातील पदे भरली जातील असा विश्वास यशवंतराव यांनी व्यक्त केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Follow up with the facilities in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.