अभूतपूर्व बंदोबस्तात वाढीव बांधकाम जमीनदोस्त

By Admin | Updated: November 5, 2015 23:59 IST2015-11-05T23:12:38+5:302015-11-05T23:59:11+5:30

गुहागर नगरपंचायत : वाढीव बांधकामावर नगरपंचायतीचा हातोडा

Floor construction in unprecedented buildings | अभूतपूर्व बंदोबस्तात वाढीव बांधकाम जमीनदोस्त

अभूतपूर्व बंदोबस्तात वाढीव बांधकाम जमीनदोस्त

गुहागर : नगरपंचायत क्षेत्रातील मुस्लिम मोहल्ला येथील मदरशाच्या इमारतीच्या असेसमेंटवरील आकारापेक्षा वाढीव बांधकाम नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून धडक कारवाई करून तोडले. प्रथमच झालेल्या या धडक कारवाईत प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात परस्पर समन्वयाचा अभाव दिसून आला.
गुहागर शहरातील मुस्लिम मोहल्ल्यात मदरसा तालीम - उल - कुर्रान ही जमातुल मुस्लिमीन, गुहागर या संस्थेची इमारत आहे. मुख्याधिकारी शिंगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वरचापाटतर्फे गुहागर येथील सर्व्हे नं. ११४/१ (१) या जमिनीचे प्रत्यक्ष क्षेत्र २१८ चौरस फूट इतके आहे. तत्कालीन ग्रामपंचायत असेसमेंटनुसार ५४६ चौरस फूट इतके बांधकाम करण्यात आले होते. मात्र, सन २०१५मध्ये नगरपंचायतीने घेतलेल्या स्थळपाहणी अहवालानुसार हे बांधकाम १०७२ चौरस फूट इतके आहे. सातबारावरील जागा आणि चालू असलेले बांधकाम यात तफावत असल्याची तक्रार माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी १३ जून २०१३ रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे केली होती. गुरुवारी प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ही कारवाई केली. गुहागरचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह १२ अधिकारी व ६० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याबाबत यापूर्वी वारंवार लेखी सूचना केल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न झाल्याने नगरपंचायत प्रशासनाने इमारतीच्या मागील बाजूचे वाढीव बांधकाम तोडले. प्रत्यक्ष कारवाईला सकाळी ६.४५ वाजता सुरुवात झाली. तत्पूर्वी येथील मुस्लिम बांधवांची रात्री बैठक झाली होती. कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग न करता शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार सकाळीच महिला व ग्रामस्थ मदरशाच्या इमारतीच्या आत व बाहेर जमले होते. सुरुवातीला त्यांनी प्रतिकार केला. महिला पोलिसांनी त्यांना बाहेर काढले आणि एका बाजूला घेऊन त्यांच्याभोवती कडे केले. (वार्ताहर)

नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरील आणि रस्त्याला, वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमण बांधकामांवर कारवाई करण्याबाबत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला असूनही मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही. हे बांधकाम तोडण्यात मुख्याधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता शहरातील अन्य अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तोडण्यात प्रशासनाने का दाखवली नाही? मदरशाच्या बेकायदा वाढीव बांधकामाविरोधात तक्रार देणाऱ्या माजी आमदार विनय नातू यांनी विशिष्ट समाजाला टार्गेट करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न का करावा, असा सवाल उपनगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी केला आहे.


नगरपंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे आणि सरकारी अतिक्रमणांवर यापुढील काळात प्रामुख्याने कारवाई केली जाणार आहे. प्रशासक म्हणून बेकायदा वाढीव बांधकाम आहे हे समोर आल्यानंतर कारवाई करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच ही कारवाई केली. यापुढेही नि:पक्षपातीपणे कारवाई केली जाईल.
- प्रसाद शिंगटे,
मुख्याधिकारी - नगरपंचायत, गुहागर


प्रशासनाने हीच तत्परता बाजारपेठेतील सरकारी जागेतील अन्य अनधिकृत बांधकामावरील कारवाई करताना दाखवावी.
- जयदेव मोरे, उपनगराध्यक्ष

Web Title: Floor construction in unprecedented buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.