पूरग्रस्त शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:29+5:302021-09-13T04:30:29+5:30
अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली ...

पूरग्रस्त शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
अडरे : जुलैमध्ये आलेल्या महापुरात शहरासह लगतच्या तालुक्यातील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे यावर्षी भातपिकासह अन्य पिके मातीतच गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी प्रामुख्याने कृषी मंत्रालयाकडून मदतीच्या आशेवर आहेत. मात्र, अद्यापही ही शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
महापुराचे पाणी शहर व लगतच्या शेतात शिरल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. मोठ्या प्रमाणात माती शेतजमिनीत पसरली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती व सोबत तीळ, वरी आदी पिके वाया गेली. महापुरापूर्वीच बहुतांश शेतकऱ्यांच्या भात व अन्य पिकांची लावणी पूर्ण झाली होती. गणेशोत्सवादरम्यान भाताचे हळवे पीक तयार होते. तसेच वरीचे तांदूळ व नाचणीला जोर येतो. ही पिके तयार होण्याच्या प्रक्रियेत असतानाच जुलैमध्ये आलेल्या महापुराच्या मातीत सर्व पिके गाडली गेली.
महापूर ओसरल्यानंतर शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी व शेतजमिनीचे पंचनामे केले. मात्र, नुकसानाबाबत शासनाकडून ठोस कार्यवाही अद्यापही झालेली नाही. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रेशनवर धान्य व काही सामाजिक संस्थांकडून अन्नधान्याची मदत यावरच सद्यस्थितीत अवलंबून राहावे लागले आहे. शेतजमीन व पिकांच्या नुकसानाबाबत शासनाकडून पर्यायाने कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा असून, ही नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी करण्यात येत आहे.