आधी महापुराने, आता चाेरट्यांनी साफ केले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:20+5:302021-09-05T04:35:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील बापट आळी व बेंदरकर आळीतील एक बंद सदानिका व एक बंगला चोरट्यांनी फोडल्याची ...

आधी महापुराने, आता चाेरट्यांनी साफ केले घर
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील बापट आळी व बेंदरकर आळीतील एक बंद सदानिका व एक बंगला चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लांबवला आहे. महापुरानंतर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांनाच चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.
शहरातील बापट आळी परिसरातील विजय कृष्णा चितळे यांच्या बंगल्यात महापुराचे पाणी गेल्यामुळे ते काही दिवसांपासून खेर्डी येथील आपल्या नातेवाईकांकडे राहात आहेत. अधूनमधून ते या बंगल्यात येत असले तरी शुक्रवारी बंगल्यात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून त्यातील सुमारे ८० हजार रुपयांच्या रोख रकमेसह दागिने असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. त्याचबरोबरच बेंदरकर आळीतील सुभाष देवरुखकर यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार व गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु हाेती.
----------------------
सांगा कसे जगायचे
महापुरानंतर अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले असून, ही झळ बसूनही ते हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. महापुरात पाण्याखाली गेलेल्या घरांची स्वच्छता झाली असली तरी अद्याप काही घरे बंद आहेत. त्यातील कुटुंबे ही अन्यत्र राहात आहेत. नेमका याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सदनिका व बंगला फोडल्याने पूरग्रस्तांनी आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे.