चिपळूणमधील पाच गाव
By Admin | Updated: February 15, 2015 23:41 IST2015-02-15T21:45:36+5:302015-02-15T23:41:40+5:30
जलयुक्त शिवार अभियान : प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठके

चिपळूणमधील पाच गाव
चिपळूण : तालुक्याक्यातील पाण्याचा प्रश्न सुटावा, टंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाच्या नवीन धोरणानुसार जलयुक्त शिवार अभियान ही योजना केतकी, कात्रोळी, गाणे, अनारी व कोसबी या गावांमध्ये राबवण्याचा निर्धार उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लहरी हवामानमुळे आजकाल वेळी अवेळी पाऊस पडतो. पिकाच्या ऐन वाढीच्या हंगामात पाऊस गुंगारा देत असल्याने पिकावर त्याचा परिणाम होतो. पावसाची अनियमितता व खंड यामुळे टंचाई निर्माण होते. ही परिस्थिती दूर करण्यासाठी शासनाने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ जलयुक्त शिवार अभियान ही योजना आणली . चिपळूण तालुक्यात उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष हजारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी समितीचे सचिव तथा तालुका कृषी अधिकारी आर. वाय. पवार सर्व खात्यांचे अधिकारी, सरपंच उपस्थित होते. पवार यांनी योजनेचे महत्त्व, कार्यपद्धती समजावून सांगितल्यावर तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली.
केतकी, कात्रोळी, गाणे, कोसबी, अनारी या निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरी व ग्रामसभा घेऊन कृषी विभागासह इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पाणी टंचाई दूर करुन ही गावे टंचाईमुक्त होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. केतकी, कात्रोळी, गाणे, कोसबी, अनारी या गावांची झालेली निवड ही तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानाला प्रेरणा देणारी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)