पाच पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

By Admin | Updated: May 26, 2014 01:00 IST2014-05-26T00:52:50+5:302014-05-26T01:00:07+5:30

आंजर्लेतील दुर्घटना : मृत पुण्याचे, दाम्पत्याचा समावेश; एक बेपत्ता

Five tourists die drowning in the sea | पाच पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

पाच पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

 दापोली : आंजर्ले खाडीतील ओहोटीच्या पाण्याने आत खेचल्यामुळे पुणे येथील नऊ पर्यटक बुडाले. यांपैकी पती-पत्नीसह पाचजणांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना स्थानिकांनी वाचविले, तर एक मुलगा बेपत्ता आहे. ही दुर्घटना आज, रविवारी दुपारी घडली. पुणे येथील डांगी, ओझा व शर्मा कुटुंबीय आपल्या परिवारांसह दापोलीनजीकच्या आंजर्ले समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. आज दुपारी एक वाजता आंजर्ले खाडीतील पाण्यात स्नान करण्यासाठी आठजण उतरले; परंतु ओहोटी सुरू असल्याने समुद्राचे पाणी आत जोरदार ओढत होते. त्यामुळे एकापाठोपाठ सर्वजण पाण्यात आत ओढले जाऊ लागले. बुडणार्‍यांपैकी काहीजणांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळपास कोणीही नसल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही. काही वेळानंतर ही बाब किनारी असलेल्या नागरिकांना कळल्यानंतर त्यांनी समुद्रात धाव घेतली. खाडीच्या मुखाशी खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटक समुद्राच्या ओहोटीच्या पाण्याबरोबर आत ओढले गेल्याने पाचजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगीता संतोष ओझा (अरण्येश्वर, पुणे), पवन पुरुषोत्तम डांगी (वय ९), ऋती शांतिलाल डांगी (१३), शाम बाबूलाल डांगी (४०) सविता शाम डांगी (३८, सर्व दत्तवाडी, पुणे) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अर्पण शर्मा (पर्वतीनगर, पुणे) हा अजूनही बेपत्ताच आहे. त्याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. रविवारी सकाळी शर्मा, ओझा, डांगी हे तीन जैन कुटुंबीय आपल्या खासगी गाडीत बसून आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. जेवण तयार होईपर्यंत समुद्रस्नान करण्याचा मोह झाल्याने काहीजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, समुद्र खाडीच्या पाण्यात सर्वजण ओढले गेले. मात्र, किनार्‍यावरील इतरांनी आरडाओरडा केल्याने तिघांचा जीव वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. ओझा व डांगी कुटुंबावर शोककळा पुण्याच्या पानमळा येथे राहणार्‍या ओझा व डांगी कुटुंबियातील पाच जणांचा दापोली तालुक्यातील अंजर्ले बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकताच दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली. (प्रतिनिधी)

Web Title: Five tourists die drowning in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.