पाच शेतकऱ्यांच्या बागा जळून खाक

By Admin | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-29T22:24:11+5:302015-12-30T00:45:07+5:30

लांजा तालुक्यातील घटना : येरवंडे येथे वणव्यात गवताच्या वरंडी जळल्या; लाखोंचे नुकसान

Five farmers planted fire | पाच शेतकऱ्यांच्या बागा जळून खाक

पाच शेतकऱ्यांच्या बागा जळून खाक

लांजा : तालुक्यातील येरवंडे येथे लागलेल्या वणव्यात येथील गरीब ५ शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागांसह गवताच्या वरंडी व गवत जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ५ शेतकऱ्यांच्या हाता - तोंडाशी आलेला घास या वणव्याने हिरावून घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येरवंडे येथील अंकुश गणपत सावंत यांची हापूस आंब्याची १५० झाडे, काजूची झाडे २५० आणि गवताच्या ३०० वरंडी जळून गेल्या. तसेच संदीप गंगाराम दळवी यांची हापूसची ३० झाडे, काजूची ४० झाडे, गवत, यशवंत सावंत यांची हापूसची १५० झाडे, काजूची २०० झाडे व गवत, सुरेश सावंत यांची हापूसची २०० झाडे, काजूची २५० झाडे, गवत, संतोष दत्ताराम दळवी यांची हापूची २०० झाडे, काजूची १५० झाडे व गवत जळू खाक झाले आहे. या बागांमध्ये सुकलेले गवत असल्याने दुपारच्या वेळेत गवताने पेट घेतल्याने शेतकऱ्यांना वणवा आटोक्यात आणणे अशक्य झाले. लहान मुलासमान वाढवलेली आंबा, काजूची बाग डोळ्यासमोर जळून खाक होताना दु:ख वाटत होते.
अथक प्रयत्न केल्यावर हा वणवा विझवण्यात यश आले. यामुळेच आजूबाजूला असणाऱ्या आंबा, काजूच्या बागा या वणव्यातून बचावल्या आहेत. मात्र, या ५ गरीब शेतकऱ्यांच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऐन हंगामात आंबा, काजू बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. (प्रतिनिधी)

नुकसान : सुकलेल्या गवताचा परिणाम
रस्त्याच्या कडेला सुकलेले गवत मोठ्या प्रमाणात असते. हे गवत वेळच्या वेळी न काढल्याने वणव्याचे प्रकार घडतात. रस्त्याच्या कडेलाच बागा असल्यास हे गवत पेटून बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गाडीतून जाताना सहजपणे पेटलेली सिगारेट किंवा काडी टाकण्याची सवय एखाद्याला असते. त्यामुळे वणव्याचे प्रकार घडत आहेत.

वणवा रोखा
कोकणात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे हे वणवे रोखणे गरजेचे आहे.

Web Title: Five farmers planted fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.