आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:02+5:302021-06-29T04:22:02+5:30
देवरुख : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील काेंड्ये लावगण वाडीतील पाचजणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल
देवरुख : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील काेंड्ये लावगण वाडीतील पाचजणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पांडुरंग भुवड यांनी आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सहायक पोलीस फौजदार विजया तांबडे यांनी दिली आहे. आत्महत्या केलेल्या प्रकाश यांची पत्नी प्रतिभा प्रकाश भुवड, सुभाष शीतप, सुनंदा बाचीम, सुरेश भुवड आणि आदी भुवड या पाचजणांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश भुवड यांनी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास लावून २६ रोजी आत्महत्या केली हाेती. मृत प्रकाश यांनी आपल्या मृत्यूस हे पाचजण कारणीभूत असल्याचे चिट्ठीत लिहून ठेवले हाेते. या चिट्ठीत बायकोच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, तसेच शेजारी राहणारा सुरेश भुवड व त्याचा मुलगा आदी याने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावली असल्याचे मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. त्यावरून या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.