वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:37 AM2021-11-29T11:37:18+5:302021-11-29T11:38:46+5:30

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे.

Fishing season in crisis due to strong winds | वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

वादळाची श्रृंखला सुरूच, मच्छिमारांचे जाळे रिकामेच

Next

रत्नागिरी : एका मागून एक आलेल्या वादळांची श्रृंखला आणि वादळी वाऱ्यामुळे मासेमारी हंगाम सुरू हाेऊनही मच्छिमारांच्या जाळ्यात फारसे काही पडलेले नाही. जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला असतानाच रविवारी सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक नाैका बंदरातच उभ्या हाेत्या.

मासेमारीचा हंगाम सुरू होऊनही व्यवसायाला अजूनही गती मिळालेली नाही. सततचे वादळी वारे आणि वादळांमुळे खवळलेला समुद्र यामुळे नाैका समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर वादळाची मालिका सुरुच आहे. वादळांसह अवकाळी कोसळणाऱ्या पावसाने तसेच मतलई वाऱ्यांमुळे मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निर्यातक्षम मासे मिळत नसून कमी प्रतीच्या माशांची मरतूक होत असल्याने मच्छिमारांना खलाशी, डिझेलचाही खर्च भागवता येत नाही.

या हंगामात चांगले मासे मिळतील अशा आशेवर असलेल्या मच्छिमारांना पुन्हा रिकाम्या हाताने किनाऱ्यावर थांबावे लागत आहे. चालू मासेमारी हंगामात वादळ, वाऱ्यांमुळे सुमारे १५ ते २० वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती. कोरोना संक्रमणापासून मासेमारीत काही ना काही व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत असल्याने मच्छिमार संकटात सापडला आहे.

निम्मे उत्पन्नही नाही

जिल्ह्यात ३,०७७ यांत्रिकी नौका आणि ४४२ बिगर यांत्रिकी नौका अशा एकूण ३,५१९ नौका आहेत. मागील ७ वर्षात माशांच्या उत्पादनात घट होऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ते निम्म्यावर म्हणजेच ६५,३७४ मेट्रीक टनावर आले होते. मात्र, चालू हंगामात सततच्या वादळ-वाऱ्यांमुळे आतापर्यंत माशांचे निम्मेही उत्पन्न मच्छिमारांना मिळालेले नाही

मच्छिमारांची स्थिती फार बिकट आहे. डिझेलचे दर वाढले त्यातच मासे मिळत नाही. त्यामुळे डिझेलचा तसेच खलाशांचाही खर्चही भागत नाही. त्यातच साडेतीन वर्षाचा डिझेलचा परतावा मिळालेला नाही. परताव्याची रक्कम शासनाने वेळीच दिल्यास त्या रक्कमेतून मच्छिमारांना काही खर्च भागवता येईल.- निसार दर्वे, मच्छिमार नेते, मिरकरवाडा

Web Title: Fishing season in crisis due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.