मच्छिमारांचे उद्या जेलभरो...
By Admin | Updated: November 18, 2015 00:02 IST2015-11-17T23:14:10+5:302015-11-18T00:02:46+5:30
रत्नागिरी : बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीनमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात

मच्छिमारांचे उद्या जेलभरो...
रत्नागिरी : पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारी नौका आणि पारंपरिक व ट्रॉलिंग मच्छिमारांमधील वाद चिघळला आहे. बेकायदा पर्ससीनमुळे पारंपरिक व ट्रॉलर्सद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बेकायदा मच्छिमारीविरोधात आवाज उठवण्यासाठी १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील मच्छिमार जेलभरो आंदोलन करणार आहेत. ही माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खात्याच्या रत्नागिरी कार्यक्षेत्रात साडेतीनशेपेक्षा अधिक अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीन मच्छिमारी नौका बेकायदेशीररित्या मच्छिमारी करीत असून, त्याकडे मत्स्य व्यवसाय खात्याचे दुर्लक्ष आहे. त्याशिवाय परराज्यातील मिनी पर्ससीन मच्छिमारी नौकाही रत्नागिरीत बेकायदा मच्छिमारी करीत आहेत.
पारंपरिक व ट्रॉलिंग मच्छिमारांच्या अनेक मागण्या आहेत. पारंपरिक मच्छिमार जगावा व पर्यावरण पूरक मच्छिमारी व्हावी, यासाठी शासनाने नवीन पर्ससीन नौकांना परवाने देऊ नयेत. डॉ. सोमवंशी समितीच्या अहवालातील ज्या २५ शिफारशी राज्य शासनाने स्वीकारल्या आहेत, त्याबाबत हिवाळी अधिवेशनात कायदा व्हावा व त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, रत्नागिरी व येथे अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले संबंधित अधिकारी यांची तत्काळ हकालपट्टी करून कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावे व बेकायदा मच्छिमारी बंद करावी, यासारख्या मागण्या संघटनेने केल्या आहेत, तर स्थानिक मच्छिमारांनी आपसात भांडून तिसऱ्याचा लाभ होऊ देऊ नये, असे निसार बोरकर यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)