मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:09 PM2018-07-18T17:09:33+5:302018-07-18T17:16:59+5:30

राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे.

Fisheries College's new entrance, students damages | मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान

मत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेच, विद्यार्थ्यांचे नुकसान

ठळक मुद्देमत्स्य महाविद्यालयाचे नवीन प्रवेश रखडलेलेचविद्यार्थ्यांचे नुकसान : प्रवेशाची अधिसूचना काढण्यास नकार

दापोली : राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे.

ही प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने कोकणातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे मत्स्यशास्त्र विभागातील पदवीपर्यंतचे व्यावसायिक शिक्षण द्यावे, असे केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केले आहे. या महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत घेण्यात येते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सर्व पदव्या व्यावसायिक पदव्या असल्याने यावर्षी या विद्यापीठातील प्रवेशाकरिता सामायिक परीक्षा (सीईटी) घेण्यात आली.

कृषी परिषदेने कृषी विद्यापीठातील महाविद्यालयातील प्रवेशाकरिता ७० टक्के गुणभार सीईटी परीक्षेवर, तर ३० टक्के गुणभार बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांना दिला. परंतु महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयात कार्यरत असलेल्या सीईटी मंडळाने केवळ १०० टक्के भार सीईटी परीक्षेला देण्यात येईल, असे कळविले.

शेवटी कृषी परिषदेने ठरविलेले ७०.३० सूत्र शासनाने मान्य केले व कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, कृषी विद्यापीठाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या मत्स्य महाविद्यालयातील पदवी प्रवेशाची अधिसूचना काढण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने नकार दिला असल्याचे समजते.

कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मत्स्य महाविद्यालयात बी.एस्सी या पदवीकरिता प्रवेश देता येणार नाही, असे कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे. कारण मत्स्यशास्त्र या विषयात पदवी देण्याचे अधिकार नागपूर येथील माफसू विद्यापीठाला आहेत, असे माफसू कायदा सांगतो. २३ जून रोजी कृषिमंत्री यांच्या दालनात या विषयासंदर्भात झालेल्या बैठकीत माफसू कायद्यात बदल करावा.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठालाही ही पदवी देण्याचा अधिकार असावा, असा निर्णय झाला होता. मात्र, शासनाच्या तीनही विभागांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत सर्वांच्या सहमतीने निर्णय होऊनही माफसू कायद्यात बदल करण्यात पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी नकार दिल्याने कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही.

कोकणातील लोकप्रतिनिधींना हा विषय अद्याप माहिती नव्हता. त्यातील काही लोकप्रतिनिधींना या विषयासंदर्भात माहिती दिली असून, नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न कोकणातील लोकप्रतिनिधी रस घेऊन सोडवणार का, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला त्यांच्या अंतर्गत असलेल्या मत्स्य महाविद्यालयात प्रवेश देण्याचे काम गेले १८ वर्षे सुरू आहे.

तसेच प्रवेश प्रकिया व पदवी देणे हे सुरू ठेवणे हा एक पर्याय आहे किंंवा मत्स्य शास्त्र विषयात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली पदवी, पदविका प्रमाणपत्रे किंंवा कोणतीही शैक्षणिक पदवी देऊ शकते, असा बदल करून ही समस्या कायमस्वरुपी सोडविता येईल, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. माफसू कायदा अस्तित्त्वात आला तेव्हापासून म्हणजे दिनांक १७ नोव्हेंबर २०००पासून हा गोंधळ सुरू आहे, त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

मत्स्य महाविद्यालयातील प्रवेशाच्या गोंधळाबाबत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी आवाज उठवू, असे सांगितले.

Web Title: Fisheries College's new entrance, students damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.