महापुरात चिपळूण पोलिसांचे पहिले रेस्क्यू ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:18+5:302021-08-14T04:37:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत ...

महापुरात चिपळूण पोलिसांचे पहिले रेस्क्यू ऑपरेशन
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुराच्या पाण्याच्या लाटांचा मारा आणि त्याने हेलकावे खाणाऱ्या, मध्येच भरकटणाऱ्या साध्या बोटीचा आधार घेत मोबाईलच्या मिणमिणत्या उजेडाचा आधार घेत पाणी आणि अंधाराचा थरारक सामना करीत पहिले रेस्क्यू चिपळूण पोलिसांच्या टीमने केले. वळवळणारे साप, महापुराच्या पाण्याचा वाढता जोर, अंधाराची भयाणता, सोसाट्याचा वारा, कोसळणारा पाऊस, बोटीत भरणारे पाणी कधीही जिवावर बेतेल अशी स्थिती असताना, चिपळूण पोलिसांच्या पथकाने महापुरात पहिले रेस्क्यू ऑपरेशन केले.
चिपळूणचा महापूर आणि अडकलेले लोक बघितल्यानंतर आताही थरकाप भरत आहे. काही लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढणे अशक्य होते. पोलीस स्थानकात सतत वाचविण्यासाठी फोन येत होते. त्यातील एक म्हणजे शहरातील मार्कंडी भागातील मयूर निवास या ठिकाणी चार महिन्यांचे बाळ आणि त्याची आई महापुराच्या पाण्यात अडकली होती. पाणी क्षणा-क्षणाला वाढत होते, तर त्या दोघांना बाहेर काढायला काही तरी करा, अशी आर्त विनवणी केली जात होती. कोणताही पर्याय नसल्याने सारी यंत्रणा हतबल बनली होती. मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते. सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीहून सीमा शुल्कची टीम आली.
सीमा शुल्कच्या रेस्क्यू बोटीबरोबर सीमा शुल्कचे दोन कर्मचारी पुराच्या पाण्यात उतरले. बोट भोगाळे इथे येताच पाण्याच्या जोरदार माऱ्यामुळे बोट विरुद्ध दिशेला ओढली जाऊ लागली. बोटीत पाणी शिरले होते. चिंचनाका येथे बोट पोहाेचताच एटीएममध्ये एक व्यक्ती अडकल्याचे काहींनी सांगितले. रमा यांच्या कमरेभोवती रोप बांधून बोया पाण्यात फेकला गेला. सीमा शुल्क विभागाच्या एका साथीने पाण्यात झेप घेऊन एटीएमचे शटर वर केले. सुरक्षा रक्षक महेश लोटेकर हे एटीएम मशीनवर उभे हाेते. महेशने बचावकर्त्याच्या अंगावर उडी घेत बोयाचा ताबा घेतला. अथक् प्रयत्नांनी बोयाच्या साहाय्याने महेशला सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. त्याचवेळी आपल्या ऑफिसमध्ये प्रमोद देवधर अडकले असल्याची आरोळी आली. काचेचा दरवाजा लोटून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर मार्कंडी येथे पुरात अडकलेल्या माय-लेकीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत सायंकाळचे साडेसात वाजले होते. पाऊस कोसळतच होता. बोटीत साचलेले पाणी रमा करमरकर काढत होत्या आणि अचानक हातातील टॉर्च पाण्यात पडला. समोर काहीच दिसेनासे झाले. त्यातच मोबाईलची लाईट सुरू करून परतीचा प्रवास सुरू केला आणि पुन्हा तोच सामना... बोटीला हेलकावे, भरकटणारी बोट असा संघर्ष करीत महापुरात उतरलेली पहिली रेस्क्यू टीम सहीसलामत परत आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक समद बेग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, रमा करमरकर, संदेश गुजर, गणेश शिंदे, हरेश पेढांबकर व होमगार्ड सुशांत आंब्रे आदी सहभागी होते.