आंबेड खुर्द येथे घराला आग; तीन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: November 9, 2014 01:49 IST2014-11-09T01:41:58+5:302014-11-09T01:49:59+5:30
तीन लाख ११ हजार रुपयांचे नुकसान

आंबेड खुर्द येथे घराला आग; तीन लाखांचे नुकसान
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द तांबेवाडीतील राजाराम गीते व सुभाष गीते यांच्या मालकीच्या संयुक्त घराला काल, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. यामध्ये तीन लाख ११ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
आंबेड खुर्द तांबेवाडीतील राजाराम गीते व सुभाष गीते यांच्या संयुक्त घरात एकूण नऊ सदस्य राहतात. नेहमीप्रमाणे काल रात्री जेवण आटोपून ते झोपी गेले. मात्र, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येऊ लागला. हे समजताच सर्वजण घराबाहेर पडले, असता घराचे छप्पर जळत असल्याचे दिसले. सर्वांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे वाडीतील ग्रामस्थ जागे झाले. यानंतर ग्रामस्थांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले. तब्बल पाच तास ग्रामस्थ व मंडळींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आगीत संपूर्ण घरासह घरातील वस्तू, लाकडी सामान बेचिराख झाले. सरपंच बापू सुर्वे यांनीही घराला आग लागल्याचे समजताच धावत येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सर्वजण प्रसंगावधान राखून वेळीच घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये राजाराम गीते यांचे एक लाख ४९ हजार रुपयांचे, तर सुभाष गीते यांचे एक लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीची खबर संगमेश्वर तहसीलदार वैशाली माने व तलाठी माळी यांना कळविण्यात आली. त्यानंतर आज, शनिवारी सकाळी त्यांनी घटनास्थळी जाऊन जळीत घराची पाहणी करून पंचनामा केला. आगीत संपूर्ण घर भस्मसात झाल्याने गीते कुटुंबीयांसमोर कोठे राहायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)