रिफायनरी’साठी तीन तालुक्यात जागापाहणी
By Admin | Updated: October 20, 2016 01:04 IST2016-10-20T01:04:03+5:302016-10-20T01:04:03+5:30
सारंग कोडोलकर : राज्य शासनाला लवकरच अहवाल रवाना होणार

रिफायनरी’साठी तीन तालुक्यात जागापाहणी
रत्नागिरी : बहुचर्चित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासंदर्भात तवसाळ (ता. गुहागर), दापोली तसेच नाणार (ता. राजापूर) येथील जागांची जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पाहणी केली असून, जागा निश्चितीसंदर्भात ंअंतिम निर्णय वरिष्ठस्तरावरून लवकरच घेतला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी सांगितले.
इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन भारतीय कंपन्यांनी कोट्यवधी गुंतवणुकीचा हा पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही अनुकूल आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्याबाबतच्या सूचना औद्योगिक विकास महामंडळ आणि महसूल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात हे सर्वेक्षण सुरू आहे.
मात्र, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हा प्रकल्प आपल्या लोकसभा मतदारसंघातील तवसाळ येथे होण्यासाठी आग्रही असल्याने प्रकल्प होण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पासाठी विशाल जागा आवश्यक असल्याने काही दिवसांपूर्वी गुहागर येथील तवसाळ तसेच दापोली येथे चाचपणी करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला तवसाळ तसेच दापोलीतील ग्रामस्थांचा काही प्रमाणात विरोध आहे.
जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी या भागांची पाहणी केली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राजापूर तालुक्यातील नाणार येथील जागेचीही पाहणी केली आहे. आधीच्या दोन जागांच्या तुलनेत राजापूर येथील जागा रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल असल्याचे त्यांच्या पाहणीत निदर्शनास आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तीनही जागांच्या पाहणीअंती राजापूर येथील जागा रिफायनरी प्रकल्पासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले असले तरी खासदार गीते हा प्रकल्प तवसाळ येथे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कुठे होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी तीनही जागांची पाहाणी केली असून, यापैकी कुठली जागा निश्चित करायची, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)