फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अर्थसहाय्य

By Admin | Updated: December 5, 2014 23:18 IST2014-12-05T22:24:56+5:302014-12-05T23:18:01+5:30

५० टक्के अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपये असून, प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते

Finance behind the development of Phule Backward class Development Corporation | फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अर्थसहाय्य

फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अर्थसहाय्य

रत्नागिरी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध उमेदवारांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. पात्र उमेदवारांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
५० टक्के अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपये असून, प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत बँक व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येते. कर्जाची परतफेड ३ ते ५ वर्षामध्ये करावयाची आहे. बीज भांडवली योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के व्याजदराने देण्यात येते. या रकमेमध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते. या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षात करावयाची आहे. अर्जदाराला ५ टक्के स्वत:चा सहभाग भरावा लागतो.
अर्ज करण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा. त्याचे वय १८ ते ५० वयोगटातील असावे. वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी एक लाख रुपयांच्या आत असावे. अर्जासोबत जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
महामंडळामार्फत फोटोग्राफी, सायकल दुकान, पान शॉप, जनरल स्टोअर्स, किराणा स्टोअर्स, डेअरी, मंडप डेकोरेशन, इलेक्ट्रीकल शॉप, ब्युटी पार्लर, शेळ्या, मेंढ्या पालन, कुक्कुटपालन, हॉटेल ढाबा, फळे, भाजी विक्री, कापड विक्री, रेडीमेड गारमेंट, आईस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्स शॉप, बैलजोडी-बैलगाडी, भांडीविक्री, बुरूडकाम, नारळविक्री, विणकाम, लाऊडस्पिकर, मटण शॉप, कटलरी, पापड लोणचे बनविणे, मिरची कांडप मशिन, पीठ गिरण, टी. व्ही. रिपेरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आयटम रिपेरिंग आॅटो रिक्षा, मालवाहतूक टेम्पो, टुरिस्ट वाहन खरेदी, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायांना अर्थपुरवठा केला जातो. तसेच स्थानिक पातळीवर चालणाऱ्या व्यवसायास अर्थपुरवठा केला जातो. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Finance behind the development of Phule Backward class Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.