अखेर खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:12+5:302021-05-25T04:35:12+5:30
चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे लसीकरणाचे केंद्र नव्हते. परिणामी खेर्डी ग्रामपंचायतीसह पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून ...

अखेर खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू
चिपळूण : तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी येथे लसीकरणाचे केंद्र नव्हते. परिणामी खेर्डी ग्रामपंचायतीसह पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून लसीकरण केंद्रासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार खेर्डीत सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरू झाले. पहिल्यादिवशी ४५ वर्षांवरील ८० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा निर्माण करण्यात आली होती. खेर्डीची लोकसंख्या तालुक्यात सर्वाधिक आहे. मात्र, येथे लसीकरण केंद्र नसल्याने अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेर्डीवासीयांना जावे लागत होते. गर्दीमुळे अनेकांना परत यावे लागत हाेते़. पुन्हा दुसऱ्यादिवशी अडरेत जायला लागते. ग्रामस्थांचे हाेणारे हाल लक्षात घेऊन खेर्डी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे व आमदार शेखर निकम यांच्याकडे खेर्डीत लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनीही आमदार शेखर निकमांना साकडे घालून लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांनीही खासदारांच्या माध्यमातून लसीकरणासाठी पाठपुरावा केला होता.
लसीकरण केंद्र सुरू हाेण्यासाठी सर्वांकडूनच जोर लागल्याने जिल्हा परिषदेने सोमवारपासून खेर्डी ग्रामपंचायत इमारतीत लसीकरण केंद्र सुरू केले. दरम्यान, लसीकरणात वाढत्या गर्दीमुळे गोंधळ होऊ नये म्हणून टोकन पद्धत सुरू केली. यावेळी अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मयेकर, सरपंच वृंदा दाते, उपसरपंच वियय शिर्के, सदस्य विनोद भुरण, अभिजित खताते, सुप्रिया उतेकर, अपर्णा दाते, सचिन मोहिते, राकेश दाभोळकर, प्रकाश पाथरूड, आरोग्य सहायक लंबे, आरोग्य सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
---------------------
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे साेमवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय दूर झाली आहे़.