रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागताच जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालयांखेरीज कुठल्याही अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, याचा फटका गंभीर आजाराचे रुग्ण तसेच महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या नाॅन कोविड खासगी रुग्णालयांना बसला होता. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या प्रयत्नामुळे जिल्हा प्रशासनाची नाॅन कोविड रुग्णालयांची ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या मिटली आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला. गंभीर रुग्णांमध्ये ऑक्सिजन खालावण्याचे प्रकार वाढले. ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागताच जिल्हाभर तुटवडा जाणवू लागला.
ही परिस्थिती उद्भवताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्व कंपन्यांकडून ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेतले. तसेच सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा नाकारण्यात आला. त्यामुळे नाॅन कोविड खासगी रुग्णालयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. प्रसूतिगृहे, अपघाती रुग्णांना सेवा देणारी तसेच विविध गंभीर शस्त्रक्रिया करणारी रुग्णालये यामध्ये अचानक ऑक्सिजनची आवश्यकता लागली तर आणायचा कुठून, असा पेच या रुग्णालयांसमोर उभा राहिला.
अखेर याचे गांभीर्य ओळखून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. वृत्तपत्रातूनही त्याचा पाठपुरावा करण्यात आला. रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी तसेच रमेश कीर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला.
अखेर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत अचानकपणे उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीच्या योग्य नियंत्रणासाठी सूचना देण्यात आल्या असून सर्व नॉन कोविड हॉस्पिटल्सना प्राणवायूचा पुरवठा राखीव कोट्यातून करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता खासगी नाॅनकोविड रुग्णालयांना भेडसावणारी ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या दूर झाल्याने दिलासा मिळाला आहे.