‘आदर्श’ महिलांची व्यवसायातून भरारी

By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:27:16+5:302015-05-29T00:01:38+5:30

:आधारवड

Fill the 'ideal' women business | ‘आदर्श’ महिलांची व्यवसायातून भरारी

‘आदर्श’ महिलांची व्यवसायातून भरारी

ग्रामीण भागात बचत गट चळवळ जोम धरू लागली आहे. स्वत:चा विकास करावा, व्यवसायात पुरूषांबरोबर आपलेही योगदान हवे, याबाबत आता महिलाही आग्रही राहू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वीची ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना आता मागे पडू लागली आहे. गृहिणीपद सांभाळतानाच बाहेरच्या विश्वात पदार्पण करण्यास आताची ग्रामीण स्त्री उत्सुक आहे. त्यासाठी आता बचत गटासारखे प्रभावी माध्यम तिला उपलब्ध झाले आहे. आज ग्रामीण भागात महिला बचत गटांचे लोण मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. बचत गटाच्या माध्यमातून उन्नती करणे शक्य आहे, हे आता महिलांना कळू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही आता बचत गटांचे कार्य जोमाने करू लागल्या आहेत.
मठ (ता. लांजा) येथील महिलाही अशा बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करीत आहेत. सोनाली नीळकंठ साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली २००४ साली आदर्श महिला बचत गटाची स्थापना झाली. मआविमच्या संयोगिनी प्रज्ञा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे कार्य सुरू झाले. सुरुवातीला या महिलांनी कोकम, पापड, लसूण चटणी, सांडगी मिरची, लोणची अशा प्रकारे पदार्थ बनविण्यास सुरूवात केली. त्यांच्या या विविध पदार्थांना प्रतिसादही चांगला मिळू लागला. या महिलांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दीपक भागवत यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत गेले. यातून या महिलांचा आत्मविश्वास वाढला. या बचत गटातील काही महिला अर्धा दिवस इतर ठिकाणीही काम करतात. या भागात अनेक काजू फॅक्टऱ्या आहेत. यापैकी काही महिला या फॅक्टरीत कामाला जातात. काही महिला गृहिणी आहेत. या सर्व महिला आपल्या व्यस्त दैनंदिन कामामधून बचत गटाच्या कामाला वेळ देतात. महिन्यातून एकदा होणाऱ्या बैठकीला सर्वच महिला वेळेवर उपस्थित असतात. बचत गटाच्या कामाबरोबरच या महिलांचा सामाजिक उपक्रमात सहभाग असतो. मध्यंतरी या महिलांनी योगशिबिरही आयोजित केले होते. महिलांसाठी असणाऱ्या कार्यक्रमात या महिला आवर्जुन उपस्थिती दर्शवितात.
या बचत गटाने अनेक ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून आपल्या पदार्थांची विक्री केली आहे. रत्नागिरीतील मराठा मंडळाच्या सभागृहात झालेल्या बचत गटांच्या वस्तुंच्या प्रदर्शन व विक्रीत येथील महिलांनी भाग घेतला होता. तसेच गणपतीपुळे येथे झालेल्या सरस प्रदर्शनातही या बचत गटाचा सहभाग होता. रत्नागिरीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शनातही या बचत गटाच्या महिलांनी भाग घेतला होता. सर्वच ठिकाणी या बचत गटांच्या वस्तूंना चांगली मागणी होती. एवढेच नव्हे; तर मुंबईतील बांद्रा, बेलापूर या ठिकाणीही वस्तू विक्रीसाठी पाठवल्या जातात. या महिलांचे पदार्थ आता अगदी मुंबईतही विक्रीसाठी जाऊ लागले आहेत. त्यातूनच आता या महिलांना चांगला नफाही मिळू लागला आहे.आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली नीळकंठ साळवी या आहेत. त्याचबरोबर वैष्णवी साळवी, रेश्मा साळवी, राधिका साळवी, मेघना साळवी, प्रतिभा साळवी, अनुसुया साळवी, शारदा साळवी, चंद्रभागा साळवी या सदस्या आहेत. यापैकी काही महिला शेतकरी आहेत. बहुतांश महिला काजू कारखान्यात कामाला जातात. सकाळी आॅ८.३० ते सायंकाळी ६ या वेळेत व्यग्र असणाऱ्या या महिला आपल्या सुटीचा वेळ आवर्जुन आपल्या बचत गटासाठी देतात.
बचत गटाच्या धडपडीची दखल घेऊन येथील बँक आॅफ इंडियाने त्यांना आर्थिक सहकार्याचा हात पुढे केला आहे. या बँकेकडून बचत गटाने मालाच्या खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्याची नियमित परतफेडही या महिलांनी केली. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना अजूनही लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे.
- शोभना कांबळे


ग्रामीण महिलाही आता पुढे ...
कुठल्याही संस्थेची वा बचत गटांची मासिक सभा असली तर प्रत्येक सभेला उपस्थित रहाणारे सदस्य मिळणे फार कठीण. पण आता ग्रामीण भागातील महिलांनाही वेळेचे महत्व कळले आहे. म्हणूनच आता गावोगावी महिला बचत गटांचे लोण पसरू लागले आहे. उद्योजकतेला एक वेगळा आयाम मिळवून देण्याचे कार्य बचत गट करू लागले आहेत. या महिलांमधील आत्मविश्वास वाढल्यानेच आता महिला विविध व्यवसायात बचत गटाच्या माध्यमातून उतरू लागल्या आहेत. यातून त्यांच्या वैयक्तिक उन्नतीबरोबरच त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक हातभार लावण्याचे कार्य त्या करीत आहेत.




आमच्या बचत गटाला कोकम व्यवसाय करायचा आहे. या भागात रातांब्याची झाडे फारशी नाहीत. पण आम्हाला कोकम तसेच इतर पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण मिळाले तर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न ही करतोय.
सोनाली साळवी, अध्यक्ष

Web Title: Fill the 'ideal' women business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.