रत्नागिरी : ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांबाबत विम्याची नुकसान भरपाई दिलेली नसेल, त्या सर्व विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांनी फसवल्याचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. तसेच, सर्वसामान्यांसाठी योजना राबविण्यात, कामकाजात अधिकाऱ्यांनी तरबेज व्हावे, तरच आपण प्रगती करू, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राणे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी पार पडली. या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.
दिव्यांगांच्या तसेच वयोश्री योजनेकडे अधिक लक्ष द्यायला हवे. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिर घेण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सौरऊर्जेबाबत येथील भौगोलिक स्थिती वरिष्ठांना सांगावी. यांत्रिकीकरणाची योजना पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.बीएसएनएलच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करून ठेकेदारांवर कारवाई करण्याची सूचना केली. जलपर्यटन सुरू करावे, पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण देण्याबाबत कौशल्य विकास विभागाने आराखडा तयार करावा. बचत गटांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधील दर्जेदार कामे करा, अशाही सूचना केल्या.खासदार राणे यांनी निर्यात वाढण्यासाठी कोणते उत्पादने आहेत, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. जिल्ह्याचे पर्यायाने राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलून काम करावे. असे सांगितले. प्रत्येक योजनांमध्ये लाभार्थ्यांचा आकडा वाढायला हवा, असे खासदार राणे म्हणाले.
जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी हाउस बोट प्रकल्प, टुरिस्टबोट प्रकल्पाबाबत माहिती दिली. बैठकीला समिती सदस्य नेहा जाधव, सतीश दिवेकर, शेखर उकार्डे, संदीप बांदकर, सुरेश सावंत, सखाराम कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.