पंचवीस वर्षे फरारी आरोपीला अटक
By Admin | Updated: August 6, 2014 00:01 IST2014-08-05T23:53:56+5:302014-08-06T00:01:14+5:30
सापळा रचला- हा आरोपी कायम त्यांना हुलकावणी देत होता

पंचवीस वर्षे फरारी आरोपीला अटक
चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथे महिलेला मारहाण केल्यानंतर तिचा विनयभंग करुन फरार झालेल्या आरोपीला २५ वर्षांनंतर पकडण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. मुंढे येथील दत्ताराम सखाराम सकपाळ (५१) या आरोपीने १९८९ मध्ये गावातील एका महिलेला मारहाण करुन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आरोपी फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. हा आरोपी कायम त्यांना हुलकावणी देत होता. पंचवीस वर्षे सकपाळ हा विविध ठिकाणे बदलत राहिला. त्यामुळे त्याला अटक करण्यात यश येत नव्हते. अखेर आज (मंगळवारी) सकाळी आरोपी चिपळूण येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांच्यासह हवालदार सुरेंद्र सावंत, घोसाळकर, गगनेश पटेकर, उमेश भागवत, अमोल यादव, दीपक ओतारी यांनी दुपारी १२ वाजता सापळा रचला. हळूहळू सकपाळ हा टप्प्यात येत असल्याचे कळल्यानंतर पोलीस सावध झाले. त्यानंतर पोलिसांनी दीपक हॉटेल परिसरात आरोपीला जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रत्नागिरी येथील विशेष कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, तब्बल २५ वर्षांनी या आरोपीला अटक करण्यात आल्याने पोलिसांचे अभिनंदन होत आहे. (प्रतिनिधी)