संयमाने सण साजरे व्हावेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:47+5:302021-09-02T05:06:47+5:30
ही आकडेवारी देण्यामागचा हेतू एवढाच की कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे गेलीच नव्हती तरीही आपण दाखविलेल्या बेफिकिरीमुळे दुसरी लाट भयानक ...

संयमाने सण साजरे व्हावेत!
ही आकडेवारी देण्यामागचा हेतू एवढाच की कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे गेलीच नव्हती तरीही आपण दाखविलेल्या बेफिकिरीमुळे दुसरी लाट भयानक ठरली. या लाटेने एकाच कुटुंबातील अनेकांचे बळी घेतले. जवळचे आप्त, नातेवाईक यांचा करुण अंत पाहण्याची वेळ आली. यात लहान मुले ही मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. ही स्थिती आता थोडीशी कमी होतेेय, असे वाटत असले तरी आता जराशीही बेफिकिरी दाखविली तरीही तिसऱ्या लाटेचा तडाखा कुठल्याही क्षणी बसू शकतो. नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या नव्या रूपातील डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर जगावरच चिंतेचे सावट पसरविले आहे. ही लाट लहान मुलांना अधिक धोकादायक असल्याचे जागतिक स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना धोका व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात आपण सारेच कोलमडून गेलो आहोत. जागतिक स्तरावरचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. अजूनही त्याचा फटका उद्याेग-व्यवसाय, नोकऱ्यांना बसला आहे. अनेक हातांचे रोजगार थांबले आहेत. गेल्या दीड-पावणेदोन वर्षाच्या काेरोनाकाळाने सर्वच पातळ्यांवर दिलेला तडाखा गेल्या शंभरच काय त्यापेक्षा अधिकच्या काळातही बसलेला नसावा. आर्थिकबरोबरच जीवितहानीही लक्षात घ्यायला हवी.
या काळात खूप काही गमावलेले आहे. ही हानी कधीच भरून येणारी नाही. त्यापेक्षाही प्रत्येकाचा जीव लाखमोलाचा आहे. तो वाचला तर सर्व काही. सण-परंपरा या पाळायलाच हव्यात. कारण या श्रद्धा जगण्यासाठी बळ देतात. मात्र, ते साजरे करताना कोरोनाची महामारी विसरून कसे चालेल? हे सण, उत्सव साजरे करणे, हे कोरोनाचा संसर्ग भीषण वाढीसाठी निमित्त ठरायला नको. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था जात-धर्मापलीकडे जाऊन जीव तोडून नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी काम करीत आहेत. मग आपणही आपल्याला वाचविण्यासाठी आपले सण-उत्सव संयमाने, कुठलाही डामडाैल न दाखवता कोरोनाची खबरदारी घेत का साजरे करू नयेत?