वागदेत आजपासून महोत्सव
By Admin | Updated: December 23, 2015 01:22 IST2015-12-23T01:08:26+5:302015-12-23T01:22:27+5:30
तयारी पूर्ण : पशुसंवर्धन विभागातर्फे कृषी, पशुपक्षी, मत्स्य, पर्यटन प्रदर्शन

वागदेत आजपासून महोत्सव
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत वागदे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी, पर्यटन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजता या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य शिबिराचा प्रारंभही होणार आहे. तर २६ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.
वागदे येथील कृषी मेळाव्याच्या ठिकाणी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ, हेमंत सावंत, पंकज दळी आदी उपस्थित होते.
संदेश सावंत म्हणाले की, २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवात ३०० हून अधिक स्टॉल्सचा समावेश आहे. या सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे.
बुधवारी सकाळी सिंधुआरोग्य मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. या शिबिरात २० गावातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तर रात्री ८.३० वाजता कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सचे ‘सारे प्रवासी घडीचे’ हे नाटक सादर होईल. २४ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली शहरातून वाद्यवृंदासह शोभायात्रा वागदे येथे प्रदर्शनस्थळी जाणार आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.
यावेळी आमदार नीतेश राणे हे उपस्थित राहतील. सायंकाळी ४.३० वाजता ऊस लागवड विषयावरील परिंसंवाद व कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘डॉग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आॅर्केस्ट्रा सादर होणार आहे. प्रदर्शनात कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाचा विशेष सहभाग असून कृषी तंत्रज्ञान व माहितीचे विशेष दालन याठिकाणी उभारले जाणार आहे. जिल्हा बॅँकेतर्फे प्रदर्शनादरम्यान कर्जावर २ टक्के विशेष सवलत दिली जाणार आहे. तर ४० टक्के अनुदानातील जनावरे खरेदीचे ४०० प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले असून या प्रदर्शनातून जनावरे पारखून खरेदी केली जाऊ शकतात. (वार्ताहर)
माती नमुने तपासणी
सिंधुदुर्गातील शेतजमिनीचा कस तपासण्यासाठी मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. २ हजार माती नमुने मोफत तपासण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अर्धा किलो माती तपासणीसाठी आणावी. तपासणीचा अहवाल त्वरित देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.