निवासी प्रयोगभूमी केंद्रात रंगला उत्सव
By Admin | Updated: January 3, 2015 00:12 IST2015-01-02T22:54:14+5:302015-01-03T00:12:40+5:30
वैविध्यपूर्ण कार्यक्रम : तीस वर्षांच्या कोकणातील कामांचा अनुभव

निवासी प्रयोगभूमी केंद्रात रंगला उत्सव
चिपळूण : प्रयोगभूमीचा वार्षिक उत्सव म्हणजे आनंदोत्सवच. गेली १० वर्षे हा आनंदोत्सव वैविध्यपूर्ण रितीने साजरा केला जातो. यावर्षीचा कार्यक्रमही आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला.
श्रमिक सहयोग या गेली ३० वर्षे कोकणात असलेल्या संस्थेने चालविलेल्या प्रयोगभूमी या निवासी शैक्षणिक केंद्राचा हा प्रयोगभूमी उत्सव चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी या सह्याद्री पर्वताच्या निसर्गरम्य गावात वसलेली ही प्रयोगभूमी. सभोवतालच्या परिसरातील पशू-पक्ष्यांच्या सुरात सूर मिसळून बागडणारी, नांदणारी येथील मुले-माणसे. अशी प्रयोगभूमी हे दोन दिवस बाहेरील पाहुण्यांनी फुलली, बहरलेली होती.
प्रा. मधु जाधव यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी दलितमित्र रघुवीर तथा तात्या कोवळे यांनी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रकाशन केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश जोशी यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिकचे अध्यक्ष दादा रोंगे, उपाध्यक्ष डॉ. जी. बी. राजे, सदस्य प्रमोद जाधव, रेखा राणे, शरयु हुजरे, सुषमा इंदुलकर हे उपस्थित होते.
प्रयोगभूमीचा १० वर्षांचा प्रवास संतोष पुरोहित यांनी चित्रफितीद्वारे मांडला. या वाटचालीत सहभागी झालेले राजन इंदुलकर, मंगेश मोहिते, रेखा मोहिते, विजय कदम, डॉ. विजय साठे, अरुण मोहिते यांना प्रश्न विचारुन बोलते करण्यात येत होते. त्यामुळे हा प्रवास जिवंतपणे सर्वांसमोर उभा राहात होता.
दुसऱ्या सत्राचे संचालन युवराज मोहिते यांनी केले. साहित्यिक अरुण काकडे, अभिजीत हेगशेट्ये, जतीन देसाई, डॉ. बाबा आमटे यांचे २५ वर्षांचे सहकारी मुकुंद दीक्षित, डॉ. विजय साठे यांनी विचार मांडले. शेवटी विस्तृत मांडणी जनआंदोलनातील झुंजार कार्यकर्त्या उल्का महाजन यांची होती. भांडवलदार वर्गाच्या विकास कल्पनेसाठी आपण बहुजनांच्या जीवनाधारेचा बळी घेत आहेत, याची जाण आपल्याला आहे का? असा निर्वाणीचा प्रश्न त्यांनी यावेळी उभा केला. रुस्तुम तांबे, मेघन मोहिते, स्नेहल एकबोटे, मंगेश शिरधनकर, प्रथमेश जाधव, शाहीन इंदुलकर, राधा प्रधान, डॉ. अजय राजेशिर्के, स्मृती तिवाडकर, पूजा यादव, नितेश धावडे, सदाफ कडवेकर यांनी यावेळी विचार मांडले. (प्रतिनिधी)