प्रजासत्ताकदिनी विविध पुरस्कारांनी गुणवंतांचा झाला सत्कार
By Admin | Updated: January 28, 2015 00:53 IST2015-01-27T22:12:23+5:302015-01-28T00:53:01+5:30
पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिके आणि शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सादर केलेल्या विविधरंगी संस्कृतीदर्शनाने उत्साहात साजरा झाला.

प्रजासत्ताकदिनी विविध पुरस्कारांनी गुणवंतांचा झाला सत्कार
रत्नागिरी : भारतीय प्रजासत्ताकाचा ६५वा वर्धापन दिन पोलीस, होमगार्ड, एन. सी. सी., महाराष्ट्र छात्रसेना, स्काऊट-गाईड, हरित सेना, पोलीस बँड आदी पथकांच्या शानदार संचलनाने, आकर्षक चित्ररथ तसेच पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिके आणि शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सादर केलेल्या विविधरंगी संस्कृतीदर्शनाने उत्साहात साजरा झाला. यावेळी चिपळूणच्या ज्येष्ठ समाजसेविका प्रमिलाताई दाबके यांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. युवकांनी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्याचं नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याने करावं, असं आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस, होमगार्ड, एन. सी. सी., महाराष्ट्र छात्रसेना, स्काऊट-गाईड, हरित सेना, पोलीस बँड आदी पथकांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी दिली. संचलनात जिल्हा माहिती कार्यालय, अ. के. देसाई हायस्कूल व सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, नगरपरिषद शिक्षण मंडळ, कृषी विभाग, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, शासकीय अध्यापक महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, एम. एस. नाईक हायस्कूल, जिल्हा क्रीडा कार्यालय, सैनिक कल्याण विभाग आणि बेटी बचाव या विषयावरील शिक्षण विभागाचा शिरगाव बीटचा चित्ररथ सहभागी झाले होते. पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच फाटक हायस्कूल, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, एम. डी. नाईक हायस्कूल, सेंट थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल, ए. डी. नाईक हायस्कूल व अ. के. देसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे दर्शन घडविले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षितता विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वच्छतामित्र करंडक स्पर्धा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, क्रीडा उद्योग पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)