अर्जुना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे शीळ रस्ता बंद होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:05+5:302021-05-25T04:35:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सलग दुसऱ्या वर्षी स्थानिक ...

अर्जुना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामामुळे शीळ रस्ता बंद होण्याची भीती
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सलग दुसऱ्या वर्षी स्थानिक जनतेला बसणार आहे. पावसाळा तोंडावर आला तरी अर्जुना नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरूच असून, या कामासाठी नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे राजापूर-शीळ, गोठणे, दोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली जाण्याची भीती आहे, तसेच उंच टेकडीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलामुळे शीळ मार्गावरील दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ठेकेदार कंपनीकडून या महामार्गावर अर्जुना नदीवर उभारल्या जाणाऱ्या सर्वाधिक उंचीच्या पुलासाठी गेल्या दोन वर्षांपासून अर्जुना नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरू आहे. हे काम करताना अर्जुना नदीचा प्रवाहच अडविण्यात आला, तर कोंढेतड बाजूने नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून पिचिंग करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून नदीपात्रात पिलर उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी नदीपात्रात मातीचा भराव टाकून नदीपात्र अडविण्यात आले. पावसाळा तोंडावर आला तरी हे काम सुरूच आहे.
गतवर्षी केवळ खांब उभारले जात असताना व नदीपात्र पूर्ण मोकळे असताना थोड्या पावसातही पुलाच्या ठिकाणी नदीपात्र तुडुंब होऊन पुराचे पाणी नजीकच्या शीळ-चिखलगाव मार्गावर येऊन हा रस्ता बंद झाला होता. गतवर्षी तब्बल दहा ते बारा वेळा हा रस्ता पाण्याखाली गेला होता. ऐन गणेशोत्सव काळात हा मार्ग पुरामुळे बंद झाल्याने हाल झाले हाेते. यावर्षी पावसाळ्यानंतर शीळ बाजूकडील पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अख्खे नदीपात्र अडविण्यात आले.
नदीपात्रात टाकण्यात आलेले दगड, तसेच कोंढेतडच्या बाजूने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माती टाकून ती पिचिंग केल्याने नदीपात्राची रुंदी कमी होणार असून, एका बाजूने भराव टाकला जात असल्याने नदीचा प्रवाह बदलून शीळ गावाकडील राजापूर-चिखलगाव या बारमाही रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूने पात्र अरुंद झाल्यास भविष्यात हा रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
----------------------
खाेदाईमुळे टेकडी खाली येण्याचा धाेका
यावर्षी शीळ-चिखलगाव रस्त्याला लागून उंच टेकडीवर पिलर उभारण्यात आल्याने व नव्याने करण्यात आलेल्या महामार्ग कामाच्या खोदाईमुळे पावसाळ्यात ही टेकडीच खाली येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, तसेच गतवर्षी पावसाळ्यानंतर काम हाती घेताना शीळ-चिखलगाव मार्गाला संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन या ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, स्थानिकांच्या मागणीचा कोणताही मुलाहिजा न बाळगता महामार्गाचे काम रेटून नेण्याचे धोरण ठेकेदार कंपनी अवलंबित आहे.