यंदा उत्पादन घटण्याची भीती
By Admin | Updated: July 3, 2014 00:35 IST2014-07-03T00:32:55+5:302014-07-03T00:35:32+5:30
शास्त्रज्ञांचा अंदाज : उगवलेली रोपे करपण्याची शक्यता

यंदा उत्पादन घटण्याची भीती
दापोली : राज्यभरात मान्सूनने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कोकणात दुबार पेरणीचे संकट नसले तरी जून महिन्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने पेरणी व भातलावणी उशिरा झाल्याने कोकणातील भातपिकाच्या उत्पादनात घट होऊ शकते, अशी भीती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. कोकणात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी जवळजवळ १ हजार मिलिमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. परंतु यावर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
भातपेरणी झाल्यानंतर सुमारे ३ ते ४ आठवड्यात भात रोपांची लागवड करावी लागते. परंतु कमी पावसामुळे रोपांची वाढ झालेली नाही. त्याचबरोबर रोपांची योग्य पद्धतीने वाढ न झाल्याने पेरणी होऊनही रोपे लागवडीसाठी तयार नाहीत. त्याचबरोबर पाऊस नसल्याने भात लागवड वेळेत न झाल्याने भात पिकांचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
भात लागवड उशिरा झाल्यास दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना उशीर होऊन त्याचा परिणाम दुबार पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला प्रत्यक्ष फटका बसणार नसला तरीही भातपिकाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना यंदा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
कोकणातील भातशेती अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडली. पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे रखडली आहेत.
त्याचबरोबर भातपिकावर लष्करी आळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. रोपावरील रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी बुरशीनाशके फवारण्याचा सल्ला विद्यापीठाकडून देण्यात आला असून, गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच जून महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)