कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:15+5:302021-04-25T04:31:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर ...

कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना मृत्यूने गाठले
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाबद्दलची भीती आणि त्यामुळे येणारे दडपण, उपचारासाठी दाखल होण्यात केली जाणारी टाळाटाळ, दुर्धर आजार यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात तब्बल १५२ रुग्णांचा बळी गेला असून, स्मशानभूमीमध्ये एकापाठोपाठ एक असे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन लढण्यानेच जगण्याची शाश्वती वाढणार असल्याने आरोग्य यंत्रणाही आता रुक्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सारे काही आटोक्यात येत आहे, असे वातावरण गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून तयार झाले होते. मात्र मार्च महिन्यापासून साऱ्याचा नूर पालटला आहे. एका बाजूला कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला अचानक मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी ८ एप्रिल रोजी घेतला. हा रुग्ण परदेशातून खेड तालुक्यातील अलसुरे गावात आला होता. त्यानंतर वर्षभरात आतापर्यंत ५२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ४६ झाली असून, १२ हजार ८२२ रुग्ण बरे झाले आहेत. तकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
एप्रिल, २०२१ मध्ये २३ दिवसांत ७०१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केला ही बाब चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूनेही अनेक रुग्णांना गाठले असून, २३ दिवसात १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयांसह खासगी कोविड रुग्णालयांमध्येही मृत्यूची कमी झालेली नाही.
उपचार घेण्यात विलंब
अनेक लोक कोरोनाची लक्षणे असूनही कोरोना चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यापेक्षा एकतर घरगुती किंवा ओळखीच्या डॉक्टरकडून उपचार करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे आजार बळावतो आणि ज्यावेळी अधिक त्रास होऊन ऑक्सिजन पातळी कमी व्हायला सुरुवात होते. त्यावेळी घरातील लोक धावपळ करुन कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करतात. मात्र, त्यावेळी फार उशिर झालेला असतो. असे जिल्ह्यात अनेक रुग्णांबाबत घडले आहे.
इतर आजारांकडे दुर्लक्ष
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांबाबत केवळ कोरोनाच्याच उपचाराला प्राधान्य दिले जाते. त्यात त्या रुग्णाच्या हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दुर्धर आजारांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय, असा प्रश्न नातेवाईकांच्या मनात आहे. कोरोना झालेले अनेक रुग्ण इतर आजारामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
कोरोनाच्या भीतीने मृत्यू
कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होण्यामागे हे एक मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झाला आहे, याची प्रचंड भीती रुग्ण मनात बाळगतात आणि त्यामुळे त्यांचे जगण्याचे मानसिक बळ कमी होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे घाबरुन रुग्ण पळून जाण्याच्या प्रकार त्यातूनच घडत आहेत. कोरोनाबद्दलच्या या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.
मानसिक दडपणकोरोनाची भीती आणि त्यातून येणारे मानसिक दडपण, हेही काही लोकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. रत्नागिरीतील महिला कोविड रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने हाताची नस कापून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेचच आवश्यक ते उपाय करण्यात आले. त्याचे वारंवार समुपदेशन करण्यात आले. मात्र तरीही त्या व्यक्तीचे मानसिक दडपण कमी झाले नाही आणि त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
डर के आगे जीत है
कोरोना झाल्यानंतरही त्यातून हजारो, लाखो लोक बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी, खासगी उपचार यंत्रणा अधिक गंभीर आहेत. गांभीर्याने उपचार त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांनी मनातून भीती काढून टाकावी. रुग्ण मानसिकदृष्ट्या जितके सक्षम असतील तितके लवकर ते बरे होतील, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.