पितृपक्षात राजकीय धुळवड
By Admin | Updated: October 6, 2015 23:45 IST2015-10-06T21:51:27+5:302015-10-06T23:45:36+5:30
रत्नागिरी नगर परिषद : उमेश शेट्ये राष्ट्रवादीत डेरेदाखल--रणसंग्राम

पितृपक्षात राजकीय धुळवड
प्रकाश वराडकर -रत्नागिरी नगरपालिकेच्या चार जागांसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीआधी पितृपक्षात राजकीय धुळवड सुरू झाली आहे. शिवसेनेत गेलेले उमेश शेट्ये राष्ट्रवादीत परतणार असल्याचे निश्चित झाले असून, त्यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. शेट्ये यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीतर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असून, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अन्य पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील परतीचा दोर कापला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उमेश शेट्ये हे पूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात होते. ते महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांशी त्यांचे न पटल्याने ते तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या महत्वाकांक्षेला शिवसेनेत वाव मिळाला नाही. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्या काळातही शेट्ये राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी सतत संपर्कात होते. त्यामुळे उमेश शेट्ये स्वगृही परतणार हे अपेक्षित होते. वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालिन कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री उदय सामंत यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला रत्नागिरीत फटका बसला होता. मात्र रत्नागिरी पालिकेत राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीची स्थिती बरी होती. परंतु नोव्हेंबर २०१४ मध्ये पालिकेत झालेल्या उपाध्यक्ष निवडीच्यावेळी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना फोडण्यात सेनेला यश आले. स्मितल पावसकर, मुनीज जमादार, प्रीती सुर्वे व दत्तात्रय साळवी या चार नगरसेवकांनी बंड करीत वेगळा गट स्थापन केला. या गटाने सहकार्य केल्यानेच सेनेचे संजय साळवी हे उपाध्यक्षपदी निवडून आले. पक्षांतरबंदी कायद्यानुसार चारही नगरसेवक अपात्र झाल्यानेच या चार जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीची सेना..
नगरसेवकपदाचा राजीनामा देत उमेश शेट्ये हे प्रभाग ४ अ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी स्नुषा कौसल्या केतन शेट्ये यांनाही प्रभाग २ मधून राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरविले आहे. प्रभाग २ मधून शिल्पा राहुल सुर्वे तर प्रभाग ४ ड मधून रुबीना उस्मान मालवणकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र प्रभाग ४ मधील सुर्र्वे यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. चार वर्षापूूर्वीच्या निवडणूकीत या चारही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. रत्नागिरीतील वर्षापूर्वीची पिछेहाट भरून काढण्यासाठी सर्वच कार्यकर्ते कार्यरत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेला धोका नाही
झुंज होणार कडवी...
रत्नागिरी शहराचा कोपरान कोपरा उमेश शेट्ये यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतील परतीमुळे व पोटनिवडणूकीत सहभागी होण्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. परंतु सेनेचे तालुकाप्रमुुख बंड्या साळवी हे कडवे शिवसैनिक असल्याने त्यांनी कोणाच्या जाण्याने शिवसेनेला कसलाही धोका नाही. चारही जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचे ठासून सांगितले आहे. त्यामुळे प्रभाग २ व प्रभाग ४ मधील प्रत्येकी दोन जागांसाठी होणाऱ्या या निवडणूकीत राष्ट्रवादी व सेना यांच्यातच कडवी झूंज होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
२०१९ पर्यंत उमेश राज?
रत्नागिरीत राष्ट्रवादी कॉँग्रेस बळकट करण्यासाठी पक्षनेतृत्वाला करिश्मा असलेल्या नेत्यांची गरज होती. त्यामुळे वन टू का फोर करू शकणाऱ्या उमेश शेट्ये यांना पक्षप्रवेशासाठी काही आॅफर्स देण्यात आल्याची चर्चा आहे. उमेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली २०१६ ची पालिका निवडणूक लढवली जाणार असून २०१९मध्ये विधानसभा निवडणूकीतही त्यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली जाणार असल्याचा शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे परतीस इच्छुक असलेल्यांचे परतीचे दोर उमेश शेट्ये स्वगृही परतल्याने कापले गेल्याचे बोलले जात आहे. २०१६पासून रत्नागिरीत पुन्हा उमेश राज येणार दावा केला जात आहे.