पाचजणी विहिरीत पडल्या; एकचा मृत्यू

By Admin | Updated: July 2, 2014 00:09 IST2014-07-02T00:03:10+5:302014-07-02T00:09:13+5:30

चिपळूण तालुक्यातील दुर्घटना : ग्रामस्थांनी वाचविला चार महिलांचा जीव

Fatechani fell in well; Death of one | पाचजणी विहिरीत पडल्या; एकचा मृत्यू

पाचजणी विहिरीत पडल्या; एकचा मृत्यू

असुर्डे : गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या पाच महिला विहिरीत पडल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी ७ वाजता चिपळूण तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडीमध्ये घडली. ग्रामस्थांनी तत्काळ केलेल्या प्रयत्नांमुळे यातील चार महिलांना जीवदान मिळाले. मात्र, दर्शना संजय आग्रे (वय ३२) हिचा मात्र त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीवरील जुने झालेले लाकडी ओंडके तुटल्याने ही दुर्घटना घडली.
बेंडलवाडीतील दर्शना संजय आग्रे, अमिता अनंत बेंडल, रोशनी राजेंद्र बेंडल, तानू गणू बेंडल, सुरेखा सुरेश बेंडल या पाच महिला पाणी आणण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर गेल्या होत्या़. या विहिरीवरील लाकडी ओंडके गेले तीनवर्षे बदलले गेले नव्हते़ त्यामुळे ते खराब झाले होते. पाच महिला एकाचवेळी पाणी काढण्यासाठी चढल्यावर त्यांच्या वजनाने ते ओंडके विहिरीत कोसळले व त्याबरोबर या पाच महिलाही विहिरीत पडल्या. किंकाळ्यांमुळे परिसरातील ग्रामस्थ विहिरीजवळ आले. त्यामध्ये शशिकांत जाधव, तुकाराम बेंडल, संदीप शिगवण यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी अमिता बेंडल, रोशनी बेंडल, तानू बेंडल, सुरेखा बेंडल या चार महिलांना वाचविले़; परंतु दर्शना आग्रे हिला वाचविण्यात मात्र त्यांना यश आले नाही.
२0 फूट खोल विहिरीच्या तळाशी गेलेल्या दर्शनाला शेवटी तुकाराम बेंडल यांनी वर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. याची माहिती खेरशेतचे पोलीस पाटील, अमर जाधव यांनी सावर्डा पोलीस स्थानकाला दिली़ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली. सायंकाळी उशिरा दर्शनावर अंत्यसंस्कार झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Fatechani fell in well; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.