राजापुरात शेतीच्या कामांनी घेतला वेग, आता प्रतीक्षा पावसाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:53+5:302021-06-01T04:23:53+5:30
राजापूर : तालुक्यामध्ये भातशेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे भातबियाणे आणि खते खरेदीची लगबग वाढली आहे. त्याचवेळी ...

राजापुरात शेतीच्या कामांनी घेतला वेग, आता प्रतीक्षा पावसाची
राजापूर : तालुक्यामध्ये भातशेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे भातबियाणे आणि खते खरेदीची लगबग वाढली आहे. त्याचवेळी मान्सूनपूर्व करण्यात येणाऱ्या कातळावरील शेतीच्या धूळफेक पेरण्यांनीही वेग घेतला असून, शेतकऱ्यांना आत पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामध्ये सातत्य नसले तरी आगामी मान्सूनचे संकेत त्यातून मिळत आहेत. मान्सूनपूर्व शेतामधील कामांनी वेग घेतला आहे. शेताची साफसफाई करण्यासह अन्य कामे करण्यामध्ये शेतकरी सध्या गुंतले आहेत. तर बियाण्यांसह खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून बाजारपेठेमध्ये गर्दी केली जात आहे.
तालुक्याच्या काही भागामध्ये कातळावर शेती केली जाते. कातळावरील शेतीसाठी लागणारी पेरणी पावसाळ्यापूर्वी केली जाते. त्याला धूळफेक पेरण्या म्हणतात. तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूर परिसरासह शहरानजीकच्या काही गावांमध्ये आजही धूळफेक पेरण्या केल्या जातात. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच या धूळफेक पेरण्यांनी तालुक्यामध्ये वेग घेतला आहे. काही भागामध्ये या धूळफेक पेरण्यांसाठी लागणारी नांगरणीची कामे सुरू आहेत. सध्या या धूळफेक पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत.